पत्रकारांच्या हक्कांसाठी प्रभावी नेतृत्वाची जबाबदारी; संघटन विस्तारासह उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांवर विशेष भर
भडगाव | प्रतिनिधी : गणेश रावळ
पत्रकारांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई या राज्यस्तरीय संघटनेने **’महाराष्ट्र चौफेर’**चे संपादक अबरार बेग सरवर बेग मिर्झा यांची उत्तर महाराष्ट्र विभाग कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती २ ऑगस्ट २०२६ पासून पुढील ११ महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात आली असून, नियुक्तीपत्रावर राज्य कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांची स्वाक्षरी आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
पत्रकारिता क्षेत्रात सातत्याने सक्रिय राहून समाजहिताच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणारे तसेच ‘महाराष्ट्र चौफेर’ या वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकाभिमुख पत्रकारिता करणारे अबरार मिर्झा यांच्यावर उत्तर महाराष्ट्रातील संघटनात्मक कार्य अधिक बळकट करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या नियुक्तीनंतर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील पत्रकारांना संघटित करणे, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रभावी लढा उभारणे, पत्रकारांच्या विविध समस्या शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविणे, नवोदित पत्रकारांना संघटनेशी जोडणे आणि संघटनेचा विस्तार करून पत्रकारांमध्ये ऐक्याची भावना दृढ करणे, या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे सोपविण्यात आल्या आहेत.
संघटनेची उद्दिष्टे, नियम आणि धोरणांचे पालन करत पत्रकारांच्या हितासाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करण्याची अपेक्षा नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. अबरार मिर्झा यांच्या नेतृत्वामुळे उत्तर महाराष्ट्रात संघटनेचे कार्य अधिक व्यापक, प्रभावी आणि गतिमान होईल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या नियुक्तीचे पत्रकार, सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले असून, अबरार मिर्झा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पत्रकारांच्या सन्मान, सुरक्षा, हक्क आणि कल्याणासाठी ते प्रभावी नेतृत्व करतील, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
