धुळ्यात दूषित पाण्याच्या पुरवठ्याने नागरिकांमध्ये चिंता; पाणी उकळूनच पिण्याचे मनपाचे आवाहन
पुराच्या पाण्यामुळे धरणांमध्ये वाढले मातीचे प्रमाण; शुद्धीकरण प्रक्रिया सुरू असल्याची कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांची माहिती
धुळे | प्रतिनिधी :
धुळे शहरातील विविध भागांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडील मुसळधार पावसानंतर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व माती मिसळल्याने पाण्याचा रंग बदलल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून पाणी उकळूनच पिण्याचे आवाहन केले आहे.
धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे तापी नदी व अक्कलपाडा धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. पुराच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात माती व गाळ धरणात मिसळल्याने शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम झाल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात माहिती देताना महापालिकेचे कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांनी सांगितले की, पुराच्या पाण्यात मातीचे प्रमाण वाढल्याने काही भागांमध्ये दूषित स्वरूपाचे पाणी पोहोचले आहे. मात्र, पाणी शुद्धीकरण केंद्रावर आवश्यक प्रक्रिया करूनच पाणीपुरवठा केला जात असून परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. नागरिकांना अधिक स्वच्छ पाणी मिळावे यासाठी अतिरिक्त शुद्धीकरण प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, नागरिकांनी कोणतीही अफवा किंवा भीती बाळगू नये, असे आवाहनही मनपाने केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पिण्याच्या पाण्यात जीवन ड्रॉपचे दोन थेंब टाकावेत, आवश्यक असल्यास तुरटीचा वापर करावा आणि पाणी उकळूनच सेवन करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांनी केले आहे.
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिकेचे पथक सातत्याने काम करत असून, शुद्ध पाण्याचा पुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याने, पिण्याच्या पाण्याबाबत आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
