जळगाव पीपल्स बँकेकडून नशिराबाद येथील ६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सामाजिक उपक्रम; गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बळ, शैक्षणिक प्रगतीसाठी साहित्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन
नशिराबाद | प्रतिनिधी :
सामाजिक बांधिलकी जपत जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळेतील ६० विद्यार्थ्यांना वह्या, व्यावसायिक पुस्तिका, कंपास पेटी, चित्रकला वही आदी शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नशिराबाद शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष विनायक वाणी होते. यावेळी जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बँकेची सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली. समाजाच्या प्रति असलेली जबाबदारी लक्षात घेऊन बँकेच्या माध्यमातून अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी मिळालेल्या शैक्षणिक साहित्याचा उपयोग आपल्या अभ्यासात सातत्य, गुणवत्ता आणि प्रगतीसाठी करावा, असे आवाहनही त्यांनी केले. शिक्षण हेच उज्ज्वल भविष्य घडविण्याचे प्रभावी साधन असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना मनापासून अभ्यास करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमास बँकेचे संचालक प्रवीण खडके, तरल शहा, निमिष पाटील, विजय जोशी, संचालिका ज्योत्स्ना बराटे, तसेच बँकेचे अधिकारी शुभश्री दप्तरी यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी नशिराबाद शिक्षण मंडळाचे संचालक ॲड. प्रदीप देशपांडे, शाळेच्या मुख्याध्यापिका एस. ए. बनसोडे, उपमुख्याध्यापक ए. डी. चौधरी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. टी. पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांनी स्वागत करत जळगाव पीपल्स बँकेच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
