महिलांच्या अवमानाविरोधात मुक्ताईनगरमध्ये सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा;
आरोपीवर कठोर कारवाईची मागणी
मुक्ताईनगर | विशेष प्रतिनिधी (गिरीश चौधरी) :
महिलांविषयी आक्षेपार्ह आणि अश्लील वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ मुक्ताईनगर येथे सर्वपक्षीय व सर्वसमाजाच्या वतीने भव्य जनआक्रोश निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत संबंधित आरोपी विजय चौधरी याच्यावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनानुसार, ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे, राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉ. हिनाताई गावित आणि ॲड. रोहिणीताई खडसे यांच्याविषयी सोशल मीडियावर अत्यंत आक्षेपार्ह व अश्लील वक्तव्य केल्याचा आरोप संबंधित आरोपीवर करण्यात आला आहे.
‘महिलांचा सन्मान हाच आपला स्वाभिमान’च्या घोषणा
‘महिलांचा सन्मान हाच आपला स्वाभिमान’ आणि ‘विकृत प्रवृत्तीचा निषेध’ अशा घोषणांनी मुक्ताईनगर शहर दणाणून गेले. प्रवर्तन चौक ते तहसील कार्यालय असा काढण्यात आलेल्या मोर्चात महिला, युवक, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
निवेदनातून मांडल्या प्रमुख मागण्या
मोर्चानंतर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना संयुक्त निवेदन देण्यात आले. त्यामध्ये पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत.
-
भारतीय न्याय संहिता (BNS) व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार संबंधित आरोपीवर बिगरजामीनपात्र गुन्हा दाखल करावा.
-
आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी.
-
महिलांच्या सन्मानाच्या दृष्टीने अशा प्रकरणांमध्ये उदाहरणार्थ कठोर भूमिका घ्यावी.
निवेदनात प्रशासनाला इशाराही देण्यात आला असून, तातडीने कारवाई न झाल्यास मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन व रास्ता रोको करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.
सर्वपक्षीय एकजूट
या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र सहभागी झाले.
यावेळी भैयासाहेब रवींद्र पाटील, प्रमोद पाटील, डॉ. जगदीश पाटील, निवृत्तीभाऊ पाटील, अनिलभाऊ पाटील, दशरथभाऊ कांडेलकर, डॉ. बी. सी. महाजन, ॲड. राहुल पाटील, दीपक पाटील, डी. के. पाटील, लताताई सावकारे, तृप्तीताई राणे, सुनीताताई भालेराव, सुधाकर बोदडे, तसेच विविध राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
