पाचोऱ्यात अवैध सट्टा-मटका व्यवसायावर कारवाईची मागणी; एकलव्य संघटना आक्रमक
तालुक्यातील सर्व अवैध धंदे तातडीने बंद करण्याची मागणी; अध्यक्ष सुधाकर वाघ व एकनाथ अहिरे यांच्या उपस्थितीत निवेदन
पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा शहर व तालुक्यात अवैधरित्या सुरू असलेल्या सट्टा-मटका व्यवसायामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप करत या व्यवसायावर तातडीने कारवाई करण्याची मागणी एकलव्य संघटनेने केली आहे.
एकलव्य संघटनेचे अध्यक्ष सुधाकर वाघ तसेच एकनाथ अहिरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पाचोरा तालुक्यात सुरू असलेले सट्टा-मटका आणि इतर अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अवैध व्यवसायांमुळे युवक व्यसनाधीन होत असून सामाजिक वातावरणही बिघडत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी अशा धंद्यांवर कठोर कारवाई करून ते कायमस्वरूपी बंद करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
याप्रकरणी संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन अवैध सट्टा-मटका व्यवसाय चालविणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा एकलव्य संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
