भरधाव ट्रकची बोलेरो पिकअपला धडक; चालक जखमी, ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा
पाळधी–जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील साई पॅलेस हॉटेलसमोर अपघात; वाहनाचे मोठे नुकसान
जगदिश सपकाळे जळगाव | प्रतिनिधी
पाळधी–जळगाव राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकने नवीन बोलेरो पिकअपला समोरून जोरदार धडक दिल्याने चालक जखमी झाला असून वाहनाचे मोठे नुकसान झाले. हा अपघात सोमवार (दि. ३ ऑगस्ट) रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास साई पॅलेस हॉटेलसमोर घडला. या प्रकरणी बुधवारी (दि. ६ ऑगस्ट) जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधेशामपाल किशोरीपाल पाल (वय ४६, रा. रामनगर, मु.पो. भरसवा, जि. बाराबंकी, उत्तर प्रदेश) हे त्यांच्या नवीन बोलेरो पिकअप (क्र. MH-19-0095 – क्रमांक उपलब्ध माहितीनुसार) घेऊन जळगावकडे येत होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या एनएल-०१-एएल-११३१ क्रमांकाच्या ट्रकचालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत बोलेरोला जोरदार धडक दिली.
या अपघातात राधेशामपाल पाल हे जखमी झाले असून बोलेरो पिकअपचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार प्रवीण पाटील पुढील तपास करीत आहेत.
