भुसावळात अनधिकृत नळजोडणीवर नगरपरिषदेची कारवाई
श्रद्धा नगरातील माऊली प्लाझा येथील दोन नळजोडण्यांबाबत नोटीस; आठ दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश
भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ शहरातील श्रद्धा नगर परिसरातील माऊली प्लाझा येथे कथित अनधिकृत नळजोडणीप्रकरणी भुसावळ नगरपरिषदेकडून संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे. माहिती अधिकार (RTI) अंतर्गत प्राप्त माहितीसह प्रत्यक्ष स्थळ पंचनाम्याच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
नगरपरिषदेच्या पाहणीत संबंधित ठिकाणी दोन नळजोडण्या आढळून आल्या असून, त्या नळजोडण्यांची नगरपरिषदेच्या अभिलेखात कोणतीही नोंद उपलब्ध नसल्याचे नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधितांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून नियमानुसार नळजोडणी नियमित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आठ दिवसांची मुदत; अन्यथा कारवाईचा इशारा
नगरपरिषदेने नोटीस प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे सादर करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. निर्धारित मुदतीत खुलासा न केल्यास संबंधित नळजोडणी खंडित करण्यात येईल तसेच नगरपरिषदेच्या नियमांनुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटिशीत देण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा माहिती अधिकाराद्वारे पाठपुरावा करणाऱ्या तक्रारदाराने शहरातील सार्वजनिक सुविधा आणि नियमांची अंमलबजावणी सर्वांसाठी समान निकषांवर व्हावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले असून पुढील प्रशासकीय निर्णयाकडे उत्सुकता वाढली आहे.
