जळगावात ‘शेतकरी–शास्त्रज्ञ मंच’ची स्थापना; आधुनिक कृषी तंत्रज्ञान प्रसाराला मिळणार नवे व्यासपीठ
शेतकरी आणि शास्त्रज्ञांमध्ये सातत्यपूर्ण संवादावर भर; शाश्वत शेती विकासासाठी संयुक्त उपक्रम
धरणगाव ग्रामीण | प्रतिनिधी (विनोद मोरे)
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र (KVK), ममुराबाद फार्म, जळगाव आणि जिल्हा परिषद, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेतकरी–शास्त्रज्ञ मंच’ या अभिनव उपक्रमाची स्थापना करण्यात आली. छत्रपती शाहू महाराज सभागृह, जिल्हा परिषद, जळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात या मंचाचा शुभारंभ करण्यात आला.
या मंचाच्या माध्यमातून शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञ यांच्यात सातत्यपूर्ण संवाद, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार तसेच स्थानिक कृषी समस्यांवर वैज्ञानिक उपाययोजना राबविण्यास चालना मिळणार आहे.
आधुनिक शेतीसाठी विविध विषयांवर भर
बैठकीत मंचाची उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि भविष्यातील आराखडा सादर करण्यात आला. प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार, हवामान बदलाशी जुळवून घेणारी शेती, मृदा आरोग्य, जलसंधारण, कृषी यांत्रिकीकरण, मूल्यवर्धन तसेच बागायती, पशुसंवर्धन, मत्स्यपालन आणि मधमाशीपालन यांसारख्या पूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यावर विशेष भर देण्यात आला.
मान्यवरांचा सहभाग
कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विकास अधिकारी, सहयोगी अधिष्ठाता, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, विविध तालुक्यांतील प्रगतशील शेतकरी, महिला व युवा शेतकरी, कृषी उद्योजक तसेच विविध पिकांचे समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांनी या अभिनव उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
शाश्वत कृषी विकासाला बळ
जिल्ह्यातील कृषी विकासदर वाढविण्यासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांना या मंचातील प्रगतशील शेतकऱ्यांचे सक्रिय सहकार्य लाभेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार होऊन शाश्वत कृषी विकासाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व प्रगतशील शेतकऱ्यांचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला.
