नागझिरा ब्लॉकमध्ये अस्वलीच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू; कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह
नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत नागझिरा ब्लॉकमधील उमरझरी वनपरिक्षेत्राच्या रिसाडा बीटमध्ये कार्यरत असलेले वनरक्षक शामू शरणागत यांचा ५ ऑगस्ट २०२६ रोजी गस्तीदरम्यान अस्वलीच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे वन विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि वनमजुरांमध्ये हळहळ व्यक्त होत असून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
नवीन ब्लॉक रचनेनंतर भेदभावाचा आरोप
वनकर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एप्रिल २०२६ पासून नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नवीन बफर रेंजची रचना करण्यात आली असून नवेगाव आणि नागझिरा असे दोन स्वतंत्र ब्लॉक तयार करण्यात आले आहेत. सध्या नवेगाव ब्लॉकचे उपसंचालक अतुल देवकर तर नागझिरा ब्लॉकचे उपसंचालक प्रीतम सिंग कोडापे आहेत.
कर्मचाऱ्यांनी आरोप केला आहे की, दोन्ही ब्लॉकमध्ये वनमजुरांच्या नियुक्तीत मोठी तफावत ठेवण्यात आली आहे. नागझिरा ब्लॉकमधील नागझिरा, उमरझरी, सडक-अर्जुनी, तिरोडा, कोका आणि गडेगाव या सहा रेंजमधील प्रत्येक कॅम्पसाठी केवळ एक वनमजूर नियुक्त करण्यात आला आहे. मात्र, नवेगाव ब्लॉकमध्ये प्रत्येक कॅम्पवर वनरक्षकासोबत दोन वनमजूर कार्यरत आहेत.
अपुऱ्या मनुष्यबळामुळे वाढला धोका
वनकर्मचाऱ्यांनी सांगितले की, यापूर्वीही नागझिरा बफर क्षेत्रात गस्तीदरम्यान दोन वनमजुरांवर अस्वलाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. त्या घटनेनंतरही मनुष्यबळ वाढविण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दुर्गम जंगल परिसरात केवळ एका वनमजुरासह गस्त घालावी लागत असल्याने वनरक्षकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होत आहे. अशाच परिस्थितीत गस्तीदरम्यान अस्वलीच्या हल्ल्यात वनरक्षक शामू शरणागत यांचा मृत्यू झाल्याने वन विभागातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
या घटनेनंतर वनरक्षक व वनमजूर संघटनांनी संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची, सर्व कॅम्पवर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची तसेच वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी केली आहे.
