हायवे पुलाच्या निकृष्ट कामासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जबाबदार धरणे चुकीचे – ज्येष्ठ नेते पी. एम. पाटील
पूल बांधकामाबाबत ठेकेदारावर कारवाईची मागणी आधीच केली होती; विरोधकांकडून राजकीय बदनामीचा प्रयत्न असल्याचा आरोप
धरणगाव | प्रतिनिधी
पाळधी–तरसोद दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विरोधकांवर राजकीय हेतूने दिशाभूल करणारे आरोप केल्याचा आरोप केला.
पी. एम. पाटील म्हणाले की, गेल्या काही दिवसांत राज्यभर झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाळधी–तरसोद परिसरातील पुलाचे नुकसान हे संबंधित ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे झाले असून, या कामाबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यापूर्वीच अनेकदा तक्रारी करून कारवाईची मागणी केली होती. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही हा विषय उपस्थित करण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, असोदा, भादली, तरसोद व पाळधी परिसरातील ग्रामस्थांनीही निकृष्ट कामाबाबत तक्रारी केल्या होत्या. संबंधित ठेकेदाराविरुद्ध कठोर कारवाई करून त्याला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकावे, परवाना रद्द करावा आणि नव्याने दर्जेदार बांधकाम करावे, अशी मागणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीच केली असल्याचे त्यांनी नमूद केले.
पी. एम. पाटील यांनी पुढे सांगितले की, काही दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, आमदार मंगेश चव्हाण आणि खासदार स्मिता वाघ यांनी घटनास्थळी पाहणी करून काम निकृष्ट झाल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. त्यामुळे केवळ पालकमंत्र्यांना लक्ष्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.
विरोधकांकडून केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी गुलाबराव पाटील यांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी जनतेने अशा आरोपांकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन केले.
पी. एम. पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सामाजिक कार्याचाही उल्लेख केला. गरीबांसाठी आरोग्य सेवा, पंढरपूर वारीसाठी मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, दिव्यांगांसाठी सहाय्य, रुग्णवाहिका, अंत्ययात्रा वाहन तसेच विविध विकासकामांमुळे त्यांना जनतेचा विश्वास मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
शेवटी त्यांनी, “गुलाबराव पाटील हे चुकीच्या कामाला कधीही पाठबळ देणार नाहीत. समाजहित आणि विकासाच्या कामांमध्ये ते सातत्याने कार्यरत असून, जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक आणि जनतेचा त्यांना कायम पाठिंबा राहील,” असा विश्वास व्यक्त केला.
