विशेष मतदार पुनरीक्षण अभियान यशस्वी पूर्ण; बी.एल.ओ. मुकेश पाटील यांचा नानाश्री फाऊंडेशनतर्फे गौरव
मतदार यादीचे १०० टक्के डिजिटायझेशन पूर्ण; कर्तव्यनिष्ठ सेवेसाठी शाल, पुष्पगुच्छ व प्रेरणादायी पुस्तक देऊन सन्मान
जळगाव | प्रतिनिधी
तालुक्यातील नंदगाव येथे भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या विशेष मतदार पुनरीक्षण (SIR) अभियानात मतदान यादी अद्ययावत करण्याचे काम नियोजनबद्ध, जबाबदारीने आणि अल्पावधीत यशस्वीरित्या पूर्ण करणारे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) मुकेश पाटील यांचा नानाश्री फाऊंडेशनतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.
लोकशाहीची खरी ताकद अचूक व पारदर्शक मतदार यादीत असल्याचे अधोरेखित करत, मतदार नोंदणी, दुरुस्ती, वगळणी तसेच इतर प्रक्रियांचे काटेकोरपणे पालन करत एन्युमरेशन फॉर्मचे १०० टक्के डिजिटायझेशन वेळेत पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी बी.एल.ओ. मुकेश पाटील यांना शाल, पुष्पगुच्छ आणि प्रेरणादायी पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना नानाश्री फाऊंडेशनचे अध्यक्ष स्वप्निल सोनवणे यांनी सांगितले की, समाजासाठी प्रामाणिकपणे आणि निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे. पारंपरिक सत्कारासोबत प्रेरणादायी पुस्तक भेट देण्यामागचा उद्देश समाजात ज्ञानाचा आणि सकारात्मकतेचा संदेश पोहोचविणे हा आहे.
या प्रसंगी उपस्थित तरुणांनी बी.एल.ओ. मुकेश पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशाच निष्ठेने जनसेवा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला मुख्याध्यापिका रागिणी सोनवणे, शिक्षिका कामिनी चव्हाण, आक्काबाई पाटील, मिनाक्षी पाटील, नानाश्री फाऊंडेशनचे स्वप्निल सोनवणे, मयुर सोनवणे, राकेश धनगर, आनंदा सोनवणे, विजय कोळी, भावेश सोनवणे, आबा कोळी, दुर्गेश सोनवणे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
