धुळेच्या कन्या डॉ. वैशाली ठाकूर यांची राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी; ‘Mrs. India Empress of the Nation 2026’मध्ये दुहेरी सन्मान
‘2nd Runner-Up’ किताबासह ‘Beauty with Purpose’ आणि ‘Mrs. Intelligent’ उपकिताबाने गौरव
पुणे / धुळे | प्रतिनिधी
धुळे जिल्ह्याच्या कन्या तथा फर्ग्युसन महाविद्यालय (स्वायत्त), पुणे येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. वैशाली अरुण ठाकूर यांनी राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित ‘Mrs. India Empress of the Nation 2026’ या सौंदर्य स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत धुळे जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
DIVA Pageants तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी ३० जुलै ते २ ऑगस्ट २०२६ दरम्यान पुण्यात पार पडली. स्पर्धेच्या Platinum Category मध्ये डॉ. ठाकूर यांनी 2nd Runner-Up हा मानाचा किताब पटकावला. यासोबतच त्यांना ‘Beauty with Purpose’ हा विशेष पुरस्कार आणि ‘Mrs. Intelligent’ हा उपकिताबही प्रदान करण्यात आला.
DIVA Pageantsच्या संस्थापक अंजना मस्करेन्हास आणि मार्केटिंग डायरेक्टर कार्ल मस्करेन्हास यांच्या मार्गदर्शनाखाली ही राष्ट्रीय स्पर्धा पार पडली. महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकीला प्रोत्साहन देणारे हे व्यासपीठ देशभरात प्रतिष्ठेचे मानले जाते.
डॉ. वैशाली ठाकूर या निवृत्त शिक्षण अधिकारी श्री. एल. टी. ठाकूर यांच्या कन्या तसेच श्री. अरुण ठाकूर (IOFS) यांच्या पत्नी आहेत. अध्यापन, संशोधन आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्या आधीच ओळखल्या जात असून, राष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे त्यांच्या कार्याला आणखी मोठी दखल मिळाली आहे.
या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक तसेच प्रशासकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, धुळे जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.
