जळगावच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना गिरीश महाजनांचे मार्गदर्शन; पारदर्शक कारभारातून शहराच्या विकासाचे आवाहन
दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात लोकप्रतिनिधींनी उत्तरदायित्व आणि विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवण्याचा दिला संदेश
जळगाव | प्रतिनिधी – विनोद मोरे
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, नाशिक केंद्र यांच्या वतीने जळगाव महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमास राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित राहून नगरसेवकांना मार्गदर्शन केले.
लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, लोकसहभाग आणि नियोजनबद्ध विकासकामांच्या माध्यमातून जळगाव शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने समर्पित भावनेने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
शहराच्या विकासासाठी स्थानिक पातळीवरील प्रश्न समजून घेऊन त्यावर प्रभावीपणे काम करणे, नागरिकांशी सातत्याने संवाद ठेवणे आणि उपलब्ध शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी आयोजित हे प्रशिक्षण लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीला अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रशिक्षणातून मिळालेले मार्गदर्शन जळगावच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
“सक्षम लोकप्रतिनिधी आणि प्रभावी स्थानिक स्वराज्य व्यवस्था हीच विकसित जळगावची खरी ताकद आहे,” असा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमास जळगाव महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी तसेच संबंधित मान्यवर उपस्थित होते.
