शहदा बस स्थानकावर सायंकाळी टवाळखोरांचा धुडगूस; विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
शाळा-महाविद्यालये सुटण्याच्या वेळेत छेडछाडीच्या तक्रारी; सायंकाळी ५ ते ६ दरम्यान नियमित पोलीस गस्तीची पालकांची मागणी
शहदा | प्रतिनिधी – सोमेश मुळे
शहदा येथील मुख्य बस स्थानक परिसरात सायंकाळी शाळा आणि महाविद्यालये सुटण्याच्या वेळेत टवाळखोरी व विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या तक्रारी वाढल्याने विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचा आरोप असून, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी बस स्थानक परिसरात तातडीने पोलीस गस्त वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.
शहरातील विविध शाळा व महाविद्यालये दररोज सायंकाळी सुमारे ५ वाजता सुटल्यानंतर ग्रामीण भागात जाणाऱ्या शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींची शहदा बस स्थानकावर मोठी गर्दी होते. याच गर्दीचा गैरफायदा घेत काही तरुण बस स्थानक परिसरात थांबत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही तरुणांकडून मोठ्याने आरडाओरड करणे, दुचाकी अस्ताव्यस्त व बेदरकारपणे चालवणे, विनाकारण परिसरात फिरणे तसेच बसची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थिनींवर अश्लील शेरेबाजी करण्याचे प्रकार होत आहेत. गर्दीचा फायदा घेऊन विद्यार्थिनींची छेडछाड केली जात असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याने अनुचित घटना घडण्यापूर्वीच पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. विशेषतः सायंकाळी ५ ते ६ या वेळेत बस स्थानक परिसरात नियमित पोलीस गस्त ठेवावी, संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तरुणांची चौकशी करावी आणि टवाळखोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व नागरिकांनी केली आहे.
विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी बस स्थानक परिसरातील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचेही नागरिकांनी नमूद केले आहे.
