न. ह. रांका विद्यालयाच्या श्रीरंग पिहूलची जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड
तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात प्रथम क्रमांक; ‘भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७’ विषयावर प्रभावी मांडणी
बोदवड | प्रतिनिधी : येथील न. ह. रांका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता नववीचा विद्यार्थी श्रीरंग सतीश पिहूल याने तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी आपली निवड निश्चित केली आहे. त्याच्या या यशाबद्दल विद्यालय परिसरात त्याचे कौतुक होत आहे.
दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी रेणुका देवी माध्यमिक विद्यालय, बोदवड येथे तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात तालुक्यातील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यंदाच्या विज्ञान मेळाव्याचा विषय ‘भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७ : भवितव्य, संधी आणि आव्हाने’ असा होता.
ऊर्जा क्षेत्रावरील प्रभावी मांडणीला प्रथम क्रमांक
श्रीरंग पिहूल याने दिलेल्या विषयावर प्रभावी आणि अभ्यासपूर्ण मांडणी करत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची आता जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड झाली आहे.
या यशासाठी त्याला विद्यालयातील विज्ञान विषयाच्या शिक्षक व शिक्षिकांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आपण हे यश संपादन करू शकलो, अशी भावना श्रीरंगने व्यक्त केली.
विद्यालयात गुणगौरव
श्रीरंगच्या यशाबद्दल विद्यालयात छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक पी. एम. पाटील यांच्या हस्ते श्रीरंग पिहूल याचा गुलाबपुष्प देऊन गुणगौरव करण्यात आला.
त्याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मिठूलाल अग्रवाल, उपाध्यक्ष अजय जैन, सचिव विकास कोटेचा, संचालक मंडळ व सदस्य, मुख्याध्यापक पी. एम. पाटील, उपमुख्याध्यापिका एम. एस. बडगुजर, उपप्राचार्य पी. आर. जोशी, पर्यवेक्षक एस. के. राणे व पी. बी. नरवाडे, तसेच विद्यालयातील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छांचा वर्षाव
तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यातील यशानंतर श्रीरंग पिहूल याच्याकडून जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यातही उत्तम कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हास्तरीय मेळाव्यात उत्कृष्ट कामगिरी करून विद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी उपस्थितांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
