कामिका एकादशीला मुक्ताईनगरीत लाखो भाविकांची मांदियाळी
नवीन व मूळ मंदिरात पहाटेपासून दर्शनासाठी रांगा; टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष, मुक्ताईनगरला यात्रेचे स्वरूप
मुक्ताईनगर | प्रतिनिधी : आषाढी एकादशीनंतर वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व असलेल्या कामिका एकादशीनिमित्त रविवारी (९ ऑगस्ट) तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर येथे लाखो भाविकांनी संत मुक्ताईचे दर्शन घेतले. मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई नवीन मंदिर तसेच कोथळी येथील आदिशक्ती श्री संत मुक्ताई समाधीस्थळ असलेल्या मूळ मंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यंदा दरवर्षीच्या तुलनेत भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने संपूर्ण मुक्ताईनगर शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामासह ‘संत मुक्ताई’च्या जयघोषात विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य प्रदेशातून लाखो वारकरी व भाविक मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले. अनेक भाविक पायी दिंडी सोहळ्यांमधून, तर काही चारचाकी, दुचाकी, रिक्षा, ट्रॅक्टर आदी वाहनांतून दर्शनासाठी आले होते.
पहाटे पाच वाजल्यापासून नवीन मंदिरात, तर कोथळी येथील मूळ मंदिरात पहाटे चार वाजल्यापासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. सायंकाळपर्यंत महिला व पुरुषांच्या दर्शनाच्या रांगा कायम होत्या. सकाळी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी, तर दुपारी विधान परिषदेचे आमदार नंदकिशोर महाजन यांनी संत मुक्ताईचे दर्शन घेतले.
कामिका एकादशीला वारकऱ्यांचे विशेष महत्त्व
आषाढी वारीनंतर येणाऱ्या कामिका एकादशीला वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर संतांचे दर्शन घेण्याची परंपरा असल्याने कामिका एकादशीच्या निमित्ताने संत मुक्ताईच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने वारकरी मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले.
शहरातील विविध ठिकाणी दिंड्यांचे स्वागत करण्यात आले. भाविकांसाठी विविध मंडळे व नागरिकांच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले.
नवीन मुक्ताई मंदिरात सात क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप
मुक्ताईनगर शहरालगत असलेल्या संत मुक्ताई नवीन मंदिरात पहाटे पाच वाजता अभिषेक, महापूजा व आरती करण्यात आली. यावेळी मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, विनायक हरणे महाराज आणि विश्वस्त पंजाबराव पाटील उपस्थित होते.
एकादशीच्या निमित्ताने मंदिर परिसरात विविध दुकाने थाटण्यात आल्याने भाविकांची मोठी वर्दळ होती. डॉ. प्रदीप पाटील (संजीवनी हॉस्पिटल, मुक्ताईनगर), किशोर सोनार (वरणगाव) आणि रुपेश पाटील (करंजी, मुक्ताईनगर) यांच्या वतीने तब्बल सात क्विंटल साबुदाणा खिचडीचा फराळ भाविकांना वाटप करण्यात आला.
कोथळीतील मूळ मंदिरात पहाटेपासून भाविकांची गर्दी
आदिशक्ती श्री संत मुक्ताईच्या कोथळी येथील मूळ मंदिरात पहाटे चार वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे पाच वाजता उद्धव महाराज जुनारे व रामभाऊ धुरळे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा करण्यात आली.
अमोल पाटील (फुलाचे, विरोदा) आणि जीवन चौधरी (बऱ्हाणपूर) यांच्या वतीने सहा क्विंटल साबुदाणा खिचडीचा फराळ वाटप करण्यात आला. तसेच चिनावल ग्रामस्थ मंडळाच्या वतीने भाविकांना भगर व केळीचे वाटप करण्यात आले.
यंदा मोठ्या संख्येने भाविक दाखल झाल्याने मंदिर परिसरात दिवसभर गर्दीचे चित्र पाहायला मिळाले.
गर्दीचा फायदा घेत मंगलपोत, पाकिटांची चोरी
भाविकांच्या मोठ्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनीही हात साफ केल्याच्या घटना घडल्या. पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही कोथळी येथील जुने मुक्ताई मंदिर तसेच मुक्ताईनगर येथील नवीन मुक्ताई मंदिर परिसरात मंगलपोत व पाकीट चोरीच्या घटना घडल्याने भाविकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आमदार स्वतः रस्त्यावर
कामिका एकादशी, रविवारचा आठवडी बाजार, शहरातील अवजड वाहतूक आणि मंदिरांकडे आलेल्या भाविकांच्या वाहनांमुळे मुक्ताईनगर शहरातील अनेक भागांत वारंवार वाहतूक कोंडी झाली. जुने मुक्ताई मंदिर, नवीन मुक्ताई मंदिर, बोदवड रोड, प्रवर्तन चौक तसेच बसस्थानक परिसरात वाहतुकीचा ताण वाढला होता.
यावेळी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः वाहतूक कोंडीच्या ठिकाणी उपस्थित राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. शहरातील नागरिकांनीही वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी सहकार्य केले.
चार अधिकारी, ७० पोलिसांचा चोख बंदोबस्त
कामिका एकादशीच्या पार्श्वभूमीवर संत मुक्ताईचे नवीन व जुने मंदिर तसेच शहरातील प्रमुख ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चार पोलीस अधिकारी आणि ७० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.
मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असूनही दर्शन व्यवस्था आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आले. भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेच्या उत्साहात पार पडलेल्या कामिका एकादशीमुळे मुक्ताईनगर नगरी दिवसभर ‘मुक्ताई नामाच्या जयघोषाने’ दुमदुमून गेली.
