लोणवाडीत गटारीवरील तुटलेले ढापे ठरताहेत अपघाती सापळे
बुद्ध विहार परिसरासह गावातील रस्त्यांची दुरवस्था; रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना जीवघेणा धोका
बोदवड प्रतिनिधी :
लोणवाडी : बोदवड तालुक्यातील लोणवाडी येथे बुद्ध विहाराजवळील परिसरासह गावातील अंतर्गत रस्त्यांवर उघड्या गटारी, तुटलेले ढापे आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावालगतच्या महामार्ग परिसरातही गटारी उघड्या असल्याने आणि अनेक ठिकाणी ढापे तुटलेल्या अवस्थेत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
तुटलेले ढापे महिनोन्महिने जैसे थे
गटारीवरील ढापे तुटल्यानंतर त्यांची वेळेत दुरुस्ती होत नसल्याने अनेक ठिकाणी गटारी उघड्या पडल्या आहेत. काही ठिकाणी केवळ कमकुवत लोखंडी ब्रॅकेट्सच्या आधारे व्यवस्था करण्यात आली असून, तीदेखील धोकादायक स्थितीत आहेत. अवजड वाहनांची सततची ये-जा, रस्त्यांची कामे तसेच बांधकामादरम्यान गटारींचे नुकसान होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गटारींचे ढापे तुटल्यानंतर संबंधित प्रशासनाने त्यांची तातडीने दुरुस्ती करणे अपेक्षित असतानाही अनेक ठिकाणी परिस्थिती महिनोन्महिने जैसे थे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला वाहन चालविताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
रात्रीच्या वेळी धोका अधिक
दिवसा उघड्या गटारी आणि तुटलेले ढापे सहज दिसून येतात. मात्र, रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशाअभावी ही धोकादायक ठिकाणे वाहनधारकांच्या लक्षात येत नाहीत. विशेषतः दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना याचा मोठा धोका असून, एखादा वाहनचालक थेट गटारीत कोसळून गंभीर जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त
गावातील रस्ते, गटारी आणि सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित मूलभूत सुविधांची नियमित देखभाल होणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. संभाव्य अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वीच धोकादायक ठिकाणांची दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
तातडीने ढापे बसविण्याची मागणी
लोणवाडीतील धोकादायक ठिकाणांची प्रशासनाने तातडीने पाहणी करून तुटलेले ढापे बसवावेत, उघड्या गटारींवर मजबूत व सुरक्षित झाकणे बसवावीत. तसेच आवश्यक ठिकाणी प्रकाशव्यवस्था, सुरक्षा उपाययोजना आणि सूचना फलक लावावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
