प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचे निर्देश
ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचा ९० दिवसांत निपटारा; महसूल विभागाच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी
पारोळा/सुरेश पाटोळे (प्रतिनिधी) :
राज्यातील ज्येष्ठ नागरिक तसेच आई-वडिलांच्या चरितार्थ व कल्याणासाठी असलेल्या ‘आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांचा चरितार्थ व कल्याण अधिनियम, २००७’ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून महसूल विभागाने राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
या मार्गदर्शक सूचनांनुसार ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींची तातडीने नोंदणी करून त्यावर कार्यवाही करण्याबरोबरच संबंधित प्रकरणांचा ९० दिवसांच्या आत निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रकरणांवर प्राधान्याने सुनावणी
ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित अपील प्रकरणांवर प्राधान्याने सुनावणी घेण्यात यावी, तसेच संबंधित न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्कांसाठी विविध कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत, तसेच त्यांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण व्हावे, यासाठी प्रशासकीय यंत्रणेला अधिक जबाबदार करण्यात आले आहे.
प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यता कक्ष
ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन, तक्रार नोंदणी आणि प्रशासकीय मदत मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कक्षाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या समस्या व तक्रारी मांडण्यासाठी सुलभ व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणावर भर
ज्येष्ठ नागरिकांना वेळेत न्याय, सन्मान आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासन संवेदनशील व उत्तरदायी असून, त्यांच्या हक्कांचे प्रभावी संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत असल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या तक्रारींचे जलद निराकरण, प्रशासकीय मदत आणि कायदेशीर संरक्षण मिळण्यास मदत होणार आहे.
