संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरात कलश मिरवणूक
‘श्री गुरु रविदास समरसता संकल्प अभियाना’ला उत्साहात प्रारंभ; समता, बंधुता व सामाजिक न्यायाचा संदेश घराघरात पोहोचविण्याचा संकल्प
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : जॉन भालेराव :
जगतगुरू संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘श्री गुरु रविदास समरसता संकल्प अभियाना’चा छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात प्रारंभ करण्यात आला. कासलीवाल गार्डन येथे भव्य कलश पूजन आणि रथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा विचार जनमानसापर्यंत पोहोचविणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
कलश पूजनानंतर शहरातून भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत नागरिक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच चर्मकार समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कलश वितरण सोहळा पार पडला.
मान्यवरांची मोठी उपस्थिती
या कार्यक्रमास भाजपा राष्ट्रीय महामंत्री दुष्यंतकुमार गौतम, समरसता संकल्प अभियानाच्या संयोजिका आमदार माधवीताई नाईक, माजी पालकमंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर, फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अनुराधाताई अतुल चव्हाण, भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे, भाजपा अनुसूचित मोर्चा प्रदेशाध्यक्ष विश्वजीत गायकवाड, माजी आमदार राम सातपुते, माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार सुहास शिरसाट, आमदार किसन वानखेडे, माजी उपमहापौर भगवान घडामोडे, महापौर समीर दादा राजूरकर, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राहुल भैया लोणीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संत-महंतांच्या उपस्थितीने भक्तिमय वातावरण
महंत नागराज बाबांचे शिष्य महंत दिवाकर बाबाजी, संत एकनाथ महाराजांचे वंशज ह.भ.प. रावसाहेब महाराज गोसावी, वीर शौर्य संप्रदायाचे डॉ. वीरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्यासह विविध संप्रदायांचे संत-महंत, महाराज आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.
संत-महंत, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांच्या मोठ्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
‘संत रविदासांचे विचार घराघरात पोहोचविणार’
यावेळी भाजपा अनुसूचित मोर्चा प्रदेशाध्यक्ष विश्वजीत गायकवाड म्हणाले, “संत रविदास महाराजांनी समता, समरसता, बंधुता आणि न्यायाचे विचार ६५० वर्षांपूर्वी समाजासमोर मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात अधोरेखित केलेल्या न्याय, स्वातंत्र्य आणि समानतेच्या मूल्यांची पेरणी संत रविदास महाराजांनी त्यापूर्वीच केली होती.”
संत रविदास महाराजांनी समता, श्रमप्रतिष्ठा आणि मानवतेचा मार्ग समाजाला दाखविला. त्यांचे हे विचार घराघरात पोहोचविण्याचे कार्य ‘समरसता संकल्प अभियान’ करणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.
या अभियानाच्या माध्यमातून संत रविदास महाराजांच्या समतावादी विचारांचा प्रसार करून सामाजिक ऐक्य, बंधुता आणि समरसतेचा संदेश व्यापक जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
