धरणगाव तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी; दहा दिवसांत उपाययोजना न झाल्यास शेतकऱ्यांचा भव्य मोर्चाचा इशारा
धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यात गेल्या महिन्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतीपिकांवर गंभीर परिणाम झाला असून तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे.
शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी आणि शिवसेनेचे तालुकाप्रमुख जयदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि. ४ सप्टेंबर रोजी धरणगाव तहसील कार्यालयात तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात गेल्या महिन्यापासून पर्जन्यमान नसल्याने शेतपिके करपण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल व उद्विग्न झाला असून परिस्थिती गंभीर बनली आहे. पावसाअभावी गुराढोरांनाही पाण्याची टंचाई भासत असून त्यांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
चारा छावण्या उभारण्याची मागणी
पशुधनासाठी तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. तसेच गिरणा नदीचे एक आवर्तन तात्काळ सोडावे आणि आगामी रब्बी हंगामासाठी लवकरात लवकर पाच आवर्तनांचे नियोजन जाहीर करावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
शासनाच्या निकषानुसार २१ दिवसांचा पावसाचा खंड पडल्यास तातडीने उपाययोजना करण्यात येतात. मात्र, धरणगाव तालुक्यात परिस्थिती गंभीर असतानाही अद्याप आवश्यक उपाययोजना झालेल्या नसल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
दहा दिवसांत उपाययोजना न झाल्यास मोर्चा
तालुक्यातील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून तातडीने दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकरी व पशुधनासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. येत्या दहा दिवसांत शासन व प्रशासनाने ठोस कारवाई केली नाही, तर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या वेळी जि.प. माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, माजी सभापती दीपक सोनवणे, नगरसेवक भागवत चौधरी, लक्ष्मण माळी, परमेश्वर महाजन, सुनील चौधरी, किरण अग्निहोत्री, जितेंद्र धनगर, शेतकरी तालुकाप्रमुख विजय पाटील, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील परदेशी, लिलाधर पाटील, नंदू पाटील, अरुण पाटील, गजानन महाजन, सुनील चव्हाण, प्रवीण पाटील, अक्षय मुथा, रियाझ बागवान, वसिम पिंजारी, प्रेमराज चौधरी, मेघनाथ ठाकरे, राकेश चौधरी, अरविंद चौधरी, शरद शिरसाठ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
