बावी जिल्हा परिषद शाळेचे तालुक्यात अव्वल यश; मान्यवरांकडून कौतुकाची थाप
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात प्रथम क्रमांक; आदर्श शिक्षक पुरस्काराबद्दल अमोल पवार यांचा सत्कार
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी | बापुसाहेब घोडेस्वार
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल जामखेड तालुक्यातील बावी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सदिच्छा भेट देत शाळेचे कौतुक केले.
यावेळी जामखेड तालुक्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर (आबा) राळेभात, जामखेड नगरपरिषदेचे सदस्य मोहन पवार, तात्यासाहेब पोकळे, माजी कृषी अधिकारी तथा बावी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सुंदरदास बिरंगळ, माजी सरपंच राम पवार, विठ्ठल कारंडे आणि नागेश बिरंगळ आदी मान्यवर उपस्थित होते.
आदर्श शिक्षक पुरस्काराबद्दल अमोल पवार यांचा सत्कार
या सदिच्छा भेटीदरम्यान शाळेचे शिक्षक अमोल पवार यांना ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार’ मिळाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
भौतिक सुविधांसह शैक्षणिक वातावरणाचे कौतुक
भेट देणाऱ्या लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी शाळेचा सुंदर परिसर, दर्जेदार पायाभूत सुविधा, स्वच्छता तसेच शैक्षणिक वातावरणाची पाहणी केली. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेने मिळवलेले हे उल्लेखनीय यश कौतुकास्पद असून इतर शाळांसाठीही ते प्रेरणादायी ठरेल, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.
शाळेने अभियानात मिळवलेल्या यशामागे शिक्षकांचे नियोजन, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग तसेच पालक व ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
