महाराष्ट्रातील मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण; ९७.१४ टक्के मतदारांची कार्यवाही पूर्ण
१७ ऑगस्टपर्यंत गणना प्रपत्र भरण्याची मुदत; १९.१७ टक्के मतदार ‘Uncollectable EF’ वर्गात
मुंबई | प्रतिनिधी :
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू असून, या मोहिमेला आता अंतिम टप्पा गाठला आहे. मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत घरोघरी जाऊन गणना प्रपत्र (Enumeration Form) भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. दि. १७ ऑगस्ट २०२६ ही प्रपत्र भरून घेण्याची अंतिम मुदत आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदारांपैकी ९ कोटी ५० लाख ५५ हजार ५९१ मतदारांची (९७.१४ टक्के) कार्यवाही पूर्ण झाली आहे. उर्वरित २७ लाख ९८ हजार ४५८ मतदारांची (२.८६ टक्के) कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.
७७.९७ टक्के मतदारांनी प्रपत्र भरून केले जमा
गृहभेटीदरम्यान आतापर्यंत ७ कोटी ६२ लाख ९९ हजार ३६० मतदारांनी (७७.९७ टक्के) गणना प्रपत्र भरून त्यावर स्वाक्षरी करून जमा केले आहे.
१.८७ कोटी मतदार ‘Uncollectable EF’ वर्गात
दरम्यान, १ कोटी ८७ लाख ५६ हजार २३१ मतदार (१९.१७ टक्के) विविध कारणांमुळे ‘Uncollectable EF’ या वर्गात नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये घरभेटीदरम्यान मतदार उपलब्ध नसणे, कायमस्वरूपी स्थलांतर, मृत्यू किंवा अन्यत्र नोंदणी झाल्याची कारणे प्रामुख्याने आहेत.
| कारण | मतदार संख्या | टक्केवारी |
|---|---|---|
| सापडू न शकलेले / गैरहजर | ६३,६१,११३ | ६.५०% |
| कायमस्वरूपी स्थलांतरित | ७१,९५,३८८ | ७.३५% |
| मृत | ३३,९४,०५३ | ३.४७% |
| अन्यत्र नोंदणी / दुबार नोंदणी | १६,६२,१२१ | १.७०% |
| इतर | १,४३,५५६ | ०.१५% |
| एकूण | १,८७,५६,२३१ | १९.१७% |
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना याद्या उपलब्ध
‘Uncollectable EF’ संवर्गातील मतदारांच्या नावांच्या याद्या संबंधित BLO मार्फत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या बूथ लेव्हल एजंट्स (BLA) यांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तसेच संबंधित जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवरही या याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना या प्रक्रियेची माहिती देण्यात आली.
१७ ऑगस्टपर्यंत पडताळणीची संधी
ज्या मतदारांच्या वास्तव्याबाबत शंका आहे किंवा ‘Uncollectable EF’ यादीतील मतदारांबाबत संबंधितांकडे माहिती उपलब्ध आहे, त्यांनी १७ ऑगस्टपर्यंत संबंधित BLO कडे माहिती द्यावी, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे. त्यानंतर प्रत्यक्ष पडताळणी करून पात्र मतदारांचे गणना प्रपत्र भरून घेण्यात येणार आहे.
मतदारांनी आपले नाव मतदार यादीत कायम राहण्यासाठी पुनरीक्षण प्रक्रियेत सहकार्य करावे, तसेच स्थलांतरित, मृत किंवा दुबार नोंदींबाबत योग्य माहिती प्रशासनाला उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
