नरव्हाळ येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
आदिवासी टायगर सेनेचा उपक्रम; शिक्षणातून प्रगती साधण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन
धुळे | प्रतिनिधी :
धुळे तालुक्यातील नरव्हाळ ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद केंद्र शाळेत ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी टायगर सेना, धुळे जिल्हा यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शिक्षणाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, वाचन व लेखनाची सवय लावून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी, असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले.
शिक्षण हे सामाजिक व आर्थिक प्रगतीचे प्रभावी माध्यम असून, आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
जागतिक आदिवासी दिन केवळ उत्सव म्हणून न साजरा करता शिक्षण, आरोग्य, संस्कृती आणि सामाजिक विकासाला चालना देणारे उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचा संदेशही यावेळी देण्यात आला. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्वीकारले. यावेळी ॲड. प्रविण मोरे (राज्य सचिव, ATS), बंटीदादा वाघ (वीर एकलव्य प्रतिष्ठान, धुळे शहर संस्थापक अध्यक्ष), गोविंदाभाऊ अहिरे (धुळे तालुकाध्यक्ष, ATS), ॲड. नितीन म्हसदे, अनिल अहिरे, नामदेव ठाकरे, विनोद ठाकरे, जिभाऊ गायकवाड, गुरू ठाकरे, प्रशांतभाऊ पाटील, अमोल ठाकरे, भैया मोरे, सुशील जाधव, नारायण कचवे (सरपंच) यांच्यासह उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक-शिक्षिका, ग्रामस्थ व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन मिळाले असून, ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला.
