जळगावात ‘भारतगॅस लाईट झिप’ १० किलोच्या नवीन कंपोझिट सिलिंडरचे दिमाखात अनावरण
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शुभारंभ; अवघ्या चार तासांत एक्सप्रेस डिलिव्हरीची सुविधा
जळगाव | प्रतिनिधी :
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) तर्फे ग्राहकांसाठी अत्याधुनिक ‘भारतगॅस लाईट झिप’ १० किलो कंपोझिट सिलिंडर सेवेचा शुभारंभ जळगावात करण्यात आला. खान्देश मिल शॉपिंग कॉम्प्लेक्स येथील रेखा गॅस एजन्सीच्या कार्यालयात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते फीत कापून तसेच डिलिव्हरी व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे जळगाव क्षेत्रीय व्यवस्थापक तुषार जगताप यांनी नवीन सेवेची माहिती दिली. देशभरातील १०० शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्याच्या नियोजनाचा भाग म्हणून जळगाव शहराची निवड करण्यात आली असून, जळगाव टेरिटरीतील निवडक चार शहरांमध्ये जळगावचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
हलके, गंजमुक्त आणि गॅस पातळी सहज दिसणार
‘भारतगॅस लाईट झिप’ सिलिंडर पारंपरिक घरगुती सिलिंडरच्या तुलनेत सुमारे ५० टक्के हलके असून, कंपोझिट फायबरपासून तयार करण्यात आले आहे. त्यामुळे ते गंजमुक्त असून हाताळण्यास सोपे असल्याचे सांगण्यात आले. सिलिंडरमधील गॅसची शिल्लक पातळी बाहेरून सहज पाहता येण्यासाठी गॅस लेव्हल इंडिकेटरची सुविधा देण्यात आली आहे.
याशिवाय ग्राहकांना अवघ्या चार तासांत एक्सप्रेस डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवीन गॅस कनेक्शन घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांनाही हे सिलिंडर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पूरग्रस्तांसाठी रेखा गॅस एजन्सीचा मदतीचा हात
देशातील विविध भागांत अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर रेखा गॅस एजन्सीने प्रधानमंत्री राष्ट्रीय आपत्ती मदत निधीसाठी १ लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे सुपूर्द केला. एजन्सीचे संचालक दिलीप चौबे यांनी हा धनादेश दिला. या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
पहिल्या ग्राहकांचा सत्कार
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘भारतगॅस लाईट झिप’चे पहिले दोन ग्राहक यांचा सत्कार करून त्यांना नवीन कनेक्शन सुपूर्द करण्यात आले. जळगाव शहरातील भारतगॅसचे अन्य वितरकही कार्यक्रमाला उपस्थित होते.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करत भारत पेट्रोलियम तसेच गॅस वितरकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा नेवे यांनी केले, तर रेखा गॅस एजन्सीचे संचालक दिलीप चौबे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एजन्सीच्या कर्मचारीवर्गाने परिश्रम घेतले.
ठळक वैशिष्ट्ये
-
१० किलो वजनाचा कंपोझिट सिलिंडर
-
पारंपरिक सिलिंडरपेक्षा सुमारे ५० टक्के हलका
-
गंजमुक्त फायबर बॉडी
-
गॅसची पातळी सहज दिसण्याची सुविधा
-
चार तासांत एक्सप्रेस होम डिलिव्हरी
-
नवीन कनेक्शनसाठीही उपलब्ध
