नरव्हाळ येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
आदिवासी टायगर सेनेचा उपक्रम; शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन
धुळे | प्रतिनिधी :
धुळे तालुक्यातील ग्रामपंचायत नरव्हाळ येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी टायगर सेना, धुळे जिल्हा यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षण हे सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याने नियमित अभ्यास, वाचन आणि लेखनाची सवय लावून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी, असे आवाहन करण्यात आले.
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असेही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
आदिवासी दिनाला सामाजिक विकासाची जोड द्यावी
आदिवासी दिन केवळ उत्सव म्हणून साजरा न करता शिक्षण, आरोग्य, संस्कृती आणि सामाजिक विकासाला चालना देणारे उपक्रम राबविणे गरजेचे आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद शाळेचे मुख्याध्यापक यांनी स्वीकारले. यावेळी आदिवासी टायगर सेनेचे राज्य सचिव ॲड. प्रविण मोरे, वीर एकलव्य प्रतिष्ठान धुळे शहराचे संस्थापक अध्यक्ष बंटीदादा वाघ, धुळे तालुकाध्यक्ष गोविंदाभाऊ अहिरे, ॲड. नितीन म्हसदे, अनिल अहिरे, नामदेव ठाकरे, विनोद ठाकरे, जिभाऊ गायकवाड, गुरू ठाकरे, प्रशांतभाऊ पाटील, अमोल ठाकरे, भैया मोरे, सुशील जाधव, नारायण कचवे (सरपंच) तसेच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक-शिक्षिका, गावातील नागरिक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
