तामसवाडीतील सात वर्षांपासून रखडलेल्या जलकुंभात अखेर पडणार पिण्याचे पाणी!
शिवसेना युवासेनेचे उपतालुकाप्रमुख गोविंद पाटील यांच्या प्रयत्नांना यश; आमदार अमोलदादा पाटील यांच्या सूचनेनंतर अधिकाऱ्यांची पाहणी
पारोळा | सुरेश पाटोळे (प्रतिनिधी)
तालुक्यातील तामसवाडी गावातील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये सात वर्षांपासून रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेला अखेर गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री योजनेअंतर्गत या भागात जलकुंभ व नळ कनेक्शनची योजना राबविण्यात आली होती. जलकुंभाचे बांधकाम पूर्ण होऊन तब्बल सात वर्षे उलटली, मात्र आजपर्यंत या जलकुंभात पाण्याचा एक थेंबही पडलेला नव्हता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
शास्त्रीनगरातील जलकुंभही पाण्याविना
तामसवाडीतील शास्त्रीनगर परिसरातही दुय्यम जलकुंभ उभारण्यात आला आहे. मात्र तेथेही अद्याप पाणीपुरवठा सुरू झालेला नसल्याने नागरिकांची पाण्यासाठीची समस्या कायम होती.
ही गंभीर बाब लक्षात घेऊन शिवसेना युवासेनेचे उपतालुकाप्रमुख गोविंद पवार यांनी पुढाकार घेत आमदार अमोलदादा पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी तामसवाडीतील पाणीपुरवठ्याची संपूर्ण परिस्थिती आमदारांच्या निदर्शनास आणून दिली.
आमदारांच्या सूचनेनंतर अधिकाऱ्यांची धाव
नागरिकांची अडचण लक्षात घेत आमदार अमोलदादा पाटील यांनी संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने तामसवाडी येथे प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना दिल्या.
यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी तामसवाडी येथे दाखल झाले. त्यांनी जलकुंभ व पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली तसेच संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधून रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
सात वर्षांनंतर पाणीपुरवठ्याची आशा
अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर वॉर्ड क्रमांक ५ तसेच शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, सात वर्षांपासून रखडलेले काम ठेकेदार प्रत्यक्षात किती दिवसांत पूर्ण करतो आणि जलकुंभातून नियमित पाणीपुरवठा कधी सुरू होतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नागरिकांना तातडीने पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने कामाला गती देऊन जलकुंभ कार्यान्वित करावा, अशी अपेक्षा परिसरातून व्यक्त होत आहे
