जरंडीचे ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार
उत्कृष्ट कामगिरीची शासनाकडून दखल; सोयगाव तालुक्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा गौरव
सोयगाव | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने सन २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षांसाठी राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी सुनील माणिकचंद मंगरुळे यांना सन २०२३-२४ या वर्षासाठीचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची शासनस्तरावर दखल घेतल्याने सोयगाव तालुक्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
विकासकामांना दिली गती
सुनील मंगरुळे यांनी जरंडी ग्रामपंचायतीत कार्यरत असताना विविध विकासकामांना गती देतानाच सामाजिक व लोकाभिमुख उपक्रम प्रभावीपणे राबविले. ग्रामपंचायतीला उपलब्ध होणाऱ्या निधीचा योग्य वापर, विकासकामांचे नियोजन, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, पायाभूत सुविधा तसेच विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर त्यांनी विशेष भर दिला.
त्यांच्या नियोजनबद्ध आणि गतिमान कार्यपद्धतीमुळे जरंडी ग्रामपंचायतीच्या विकासाला नवी दिशा मिळाली. विविध उपक्रमांमध्ये ग्रामस्थांचा सहभाग वाढवून ग्रामपंचायतीच्या कामकाजाला अधिक लोकाभिमुख स्वरूप देण्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली.
जरंडी ग्रामपंचायतीच्या कामगिरीची राज्यस्तरावर दखल
जरंडी ग्रामपंचायतीने विकासाच्या विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे गावाची आदर्श ग्रामपंचायतीच्या स्पर्धेतील सक्षम ग्रामपंचायत म्हणून ओळख निर्माण झाली आहे. या कामगिरीची राज्यस्तरावर दखल घेत सुनील मंगरुळे यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
यशवंत पंचायत राज अभियानाच्या पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शासनाच्या वतीने गौरव करण्यात येतो. या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी सुनील मंगरुळे यांची निवड झाल्याने जरंडी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या यशामुळे जरंडी गावासह सोयगाव तालुक्याचा नावलौकिक राज्यस्तरावर पोहोचला आहे.
फोटोओळ : राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कारासाठी निवड झालेले जरंडी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी सुनील माणिकचंद मंगरुळे.
