उमेद अभियानातील कथित गैरव्यवहाराविरोधात महिला आक्रमक; बेशरमची फुले घेऊन सीईओ दालनाबाहेर ठिय्या
सहा दिवसांच्या ‘बिऱ्हाड’ आंदोलनानंतर बचत गटांच्या महिलांचा संताप; चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी
धुळे | प्रतिनिधी : उमेद अभियानातील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ बचत गटांच्या महिला आक्रमक झाल्या असून, बेशरमची फुले हातात घेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी कथित भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे जिल्हा परिषद परिसरात काही काळ वातावरण तापले होते.
महाराष्ट्र शासनाच्या उमेद व मानव विकास अभियानाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी विविध प्रकारच्या मशीनचे वाटप करण्यात आले होते. मात्र, काही मशीन कालांतराने बंद पडल्याने बचत गटांच्या महिलांचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मशीनच्या खरेदी प्रक्रियेत कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत महिलांनी यापूर्वीही प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने देऊन चौकशी व कारवाईची मागणी केली होती.
सहा दिवसांपासून ‘बिऱ्हाड’ आंदोलन
प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने महिलांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी ‘बिऱ्हाड’ आंदोलन सुरू केले होते. मात्र, हे आंदोलन सहा दिवस सुरू असूनही प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने महिलांचा संताप वाढला.
अखेर संतप्त झालेल्या बचत गटांच्या महिलांनी बेशरमची फुले घेऊन जिल्हा परिषद सीईओंच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी कथित गैरव्यवहाराची चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच महिलांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
सीईओंना निवेदन; चर्चेतून मांडल्या मागण्या
आंदोलनादरम्यान महिलांनी जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर सीईओंना निवेदन देऊन विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी देण्यात आलेल्या साधनसामग्रीचा योग्य वापर झाला की नाही, मशीन खरेदी प्रक्रियेत नियमांचे पालन झाले की नाही, तसेच मशीन बंद पडण्यामागील कारणांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
महिलांच्या या आंदोलनामुळे उमेद अभियानातील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, आता जिल्हा प्रशासन याप्रकरणी कोणती भूमिका घेते आणि चौकशी करून दोषींवर काय कारवाई केली जाते, याकडे बचत गटांच्या महिलांचे लक्ष लागले आहे.
आंदोलनात सहभागी
या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते बापू बागुल, भारती माळी, रेखाबाई पाटील, संगीता पाटील, मनिषा पाटील, सरलाबाई पाटील, सरला महाले, निर्मला महाले, ज्योती साळुंखे, सुरेखा साळुंखे, संगीता साळुंखे यांच्यासह बचत गटांच्या महिला सहभागी झाल्या.
