मूळ ध्वजस्तंभ हटविल्याप्रकरणी भडगाव नगरपरिषदेसमोर धरणे आंदोलन; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाचे मौन कायम
१५ ऑगस्टला मुख्याधिकारी नेमक्या कोणत्या ध्वजस्तंभावर ध्वजारोहण करणार? नागरिकांमध्ये उत्सुकता
भडगाव | प्रतिनिधी : गणेश रावळ
भडगाव नगरपरिषद कार्यालयातील मूळ राष्ट्रीय तिरंगा ध्वजस्तंभ हटविण्यात आल्याच्या प्रकरणावरून प्रशासनासमोरील प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. या प्रकरणी भावेश भगवान पाटील यांनी चौकशी करून नगरपरिषद कार्यालयाचा मूळ ध्वजस्तंभ पूर्ववत उभारण्याची मागणी केली होती. मात्र, निवेदन देऊन सुमारे १५ दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही अथवा तक्रारदाराला अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आलेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
७५ फूट ध्वजस्तंभाबाबतही प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयानुसार, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी ७५ फूट उंच राष्ट्रीय ध्वज उभारण्याची तरतूद करण्यात आली होती. याच ७५ फूट ध्वजस्तंभाचा संदर्भ देत नगरपरिषद प्रशासनाकडे त्याबाबतचा अधिकृत आदेश, पत्रव्यवहार आणि वापराचा उद्देश याविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
नगरपरिषद कार्यालयाचा मूळ ध्वजस्तंभ नेमका का हटविण्यात आला? ७५ फूट ध्वजस्तंभ कोणत्या उद्देशाने उभारण्यात आला? तो तालुका मुख्यालयाचा ध्वजस्तंभ आहे की नगरपरिषद कार्यालयाचा? तसेच नगरपरिषद कार्यालयातील नियमित ध्वजारोहणासाठी स्वतंत्र व्यवस्था का करण्यात आली नाही? असे प्रश्न आंदोलनकर्त्यांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.
१५ ऑगस्टला मुख्याधिकारी कोणत्या ध्वजस्तंभावर ध्वजारोहण करणार?
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आता भडगावकरांचे लक्ष एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे लागले आहे. १५ ऑगस्ट रोजी नगरपरिषद कार्यालयाचे मुख्याधिकारी नेमक्या कोणत्या ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज फडकवणार?
मूळ नगरपरिषद ध्वजस्तंभ हटविण्यात आला असल्यास ७५ फूट ध्वजस्तंभावरच नगरपरिषद कार्यालयाचे ध्वजारोहण केले जाणार आहे का, की कार्यालयासाठी स्वतंत्र ध्वजस्तंभ पुन्हा उभारण्यात येणार आहे, याबाबत प्रशासनाने अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही.
१३ ऑगस्टपासून धरणे आंदोलन
प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ भावेश भगवान पाटील यांनी १३ ऑगस्ट २०२६ पासून भडगाव नगरपरिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या आंदोलनाला लताई फाउंडेशन भडगावचे अध्यक्ष सुधीर अहिरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांनी जाहीर पाठिंबा दिला. तसेच बहुजन मुक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी विनोद अडकमोल, तालुका पदाधिकारी प्रल्हाद बाविस्कर, तालुकाध्यक्ष भटु सरदार, समाजसेवक भगवान शिंदे यांच्यासह असंख्य नागरिकांनीही आंदोलनाला समर्थन दर्शविले.
राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान, शासन निर्णयाची योग्य अंमलबजावणी, प्रशासनातील पारदर्शकता आणि नगरपरिषद कार्यालयाचा मूळ ध्वजस्तंभ पूर्ववत उभारावा, या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
प्रशासन मौन सोडणार का?
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही प्रशासनाकडून या प्रकरणावर ठोस भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. राष्ट्रीय ध्वजाशी संबंधित विषय असल्याने प्रशासनाने वस्तुस्थिती नागरिकांसमोर स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.
मूळ ध्वजस्तंभ कोणत्या आदेशाने हटविण्यात आला, ७५ फूट ध्वजस्तंभासाठी शासन निर्णयानुसार कोणती कार्यवाही झाली आणि सध्या नगरपरिषद कार्यालयातील ध्वजारोहणाची अधिकृत व्यवस्था कोणती आहे, याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. १५ ऑगस्टपूर्वी प्रशासन या प्रकरणावर निर्णय घेते का? मूळ ध्वजस्तंभ पुन्हा उभारला जातो का? आणि स्वातंत्र्यदिनी अखेर कोणत्या ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज फडकविला जातो? याकडे आता भडगावकरांचे लक्ष लागले आहे.
