स्वातंत्र्य दिनानिमित्त हुतात्म्यांना रक्तदानाने वंदन
रेडक्रॉस सोसायटी व मुक्ती फाउंडेशनचा विशेष उपक्रम; शतकवीर रक्तदाता मुकुंद गोसावी यांच्याकडून स्वयंस्फूर्त रक्तदान
जळगाव | प्रतिनिधी
देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य वीरांनी आपल्या प्राणांची आहुती देत बलिदान दिले. या अमर हुतात्म्यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली अर्पण करण्यासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी (रक्तकेंद्र) आणि मुक्ती फाउंडेशन यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदानाचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.१५ वाजता रेडक्रॉस भवन येथे हा उपक्रम होणार आहे. आपल्या शारीरिक व्यंगाला न जुमानता सातत्याने रक्तदान करणारे शतकवीर रक्तदाता मुकुंद गोसावी यावेळी स्वयंस्फूर्त रक्तदान करून शहीद हुतात्म्यांना विनम्र आदरांजली अर्पण करणार आहेत.
रक्तदानातून हुतात्म्यांना अनोखी श्रद्धांजली
देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांची आठवण केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता रक्तदानाच्या माध्यमातून समाजसेवेचा संकल्प करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शहरासह जिल्ह्यातील सामाजिक, सेवाभावी संस्था, प्रतिष्ठाने, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वर्षभर नियमितपणे रक्तदान उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गरजू रुग्णांसाठी रक्तदान ठरते जीवनदान
अपघातग्रस्त, गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांसह थॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल आणि रक्तक्षय यांसारख्या आजारांशी लढणाऱ्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या या पवित्र कार्यात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुकुंद गोसावी, इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि मुक्ती फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.
