शहीद हुतात्म्यांना मुकुंद गोसावी यांची रक्तदानाने आदरांजली
रेडक्रॉस सोसायटी व मुक्ती फाउंडेशनचा सेवा उपक्रम; स्वातंत्र्यदिनी दिव्यांग विक्रमी रक्तदात्याचे स्वयंस्फूर्त रक्तदान
जळगाव | प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि मुक्ती फाउंडेशन यांच्या वतीने अमर शहीद हुतात्म्यांना रक्तदानाच्या माध्यमातून अनोखी आदरांजली अर्पण करण्यात आली. या प्रेरणादायी उपक्रमात दिव्यांग विक्रमी रक्तदाते मुकुंद गोसावी यांनी आपल्या शारीरिक व्यंगाला न जुमानता स्वयंस्फूर्त रक्तदान करून देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले.
१५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित या रक्तदान उपक्रमाचा उद्देश गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देणे हा होता. थॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल, रक्तक्षय तसेच गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांना नियमित रक्तपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी रेडक्रॉसचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रोहनजी घुगे (आयएएस), चेअरमन मंगलाजी ठोंबरे, रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार जैन, उपाध्यक्ष गनीभाई मेमन, डॉ. शशिकांत गाजरे, हेमंत जकातदार, डॉ. उल्हास तासखेडकर, अनिल भोळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि रक्तदाते उपस्थित होते.
रक्तदानातून हुतात्म्यांना अनोखे अभिवादन
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या त्यागाची आठवण ठेवत स्वातंत्र्य दिनी रक्तदान करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.
या उपक्रमासाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे एस.पी. गणेशकर, सीए हितेश आगीवाल, गणेश पाटील, अक्षय महाजन, सतीशकुमार महाजन, हर्षद भारती, अजय देशमुख, गोपाल वालेचा, अविनाश पाटील, रणजीत गव्हाळे, डॉ. मेहुल कुमार, वैभव निकुंभ आदींनी सहकार्य केले.
वर्षभर रक्तदान करण्याचे आवाहन
शहरासह जिल्ह्यातील सामाजिक व सेवाभावी संस्था, प्रतिष्ठाने, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ केवळ स्वातंत्र्य दिनापुरते मर्यादित न राहता वर्षभर रक्तदान सेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन विक्रमी रक्तदाते मुकुंद गोसावी यांनी केले.
रक्तदानाच्या माध्यमातून गंभीर आणि गरजू रुग्णांना जीवनदान देणे ही समाजाप्रती महत्त्वाची सेवा असून, अधिकाधिक नागरिकांनी या सेवाकार्यात सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.
