धुळ्यात महामार्गावर दोन वाहनांना भीषण आग; कार घेऊन जाणारा कंटेनर आणि गाजराचा आयशर जळून खाक
बाबळे फाट्याजवळ कंटेनरमधील पाच कार भस्मसात; पळासनेरजवळ आयशर पलटी होऊन आग, लाखोंचे नुकसान
धुळे | सुनील निकम । प्रतिनिधी :
मुंबई–आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाहनांना भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. बाबळे फाट्याजवळ कार घेऊन जाणाऱ्या कंटेनरला आग लागून त्यातील पाच कार जळून खाक झाल्या, तर दुसऱ्या घटनेत पळासनेरजवळ गाजर घेऊन जाणारा आयशर ट्रक सिमेंटच्या कठड्याला धडकून पलटी झाल्यानंतर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. दोन्ही घटनांमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूरहून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला बाबळे फाट्याजवळ अचानक भीषण आग लागली. या कंटेनरमधून कारची वाहतूक केली जात होती. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने कंटेनरमधील पाच कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. आगीमुळे वाहनांमधून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट परिसरात पसरले होते.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. या कारवाईमुळे कंटेनरमधील काही वाहने वाचविण्यात यश आले, मात्र पाच कार जळून खाक झाल्याची माहिती आहे.
गाजर वाहतूक करणारा आयशर पलटी
दुसरी घटना पळासनेरजवळ घडली. मध्य प्रदेशातून शिरपूरच्या दिशेने गाजर घेऊन येणारा आयशर ट्रक महामार्गावरील सिमेंटच्या कठड्याला धडकला. धडकेनंतर ट्रक पलटी झाला आणि त्याला अचानक भीषण आग लागली.
आगीने काही वेळातच संपूर्ण आयशर ट्रकला वेढले. अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र, आगीची तीव्रता मोठी असल्याने आयशर ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. ट्रकमधील गाजरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
महामार्गावर वाहतूक कोंडी
एकाच दिवशी महामार्गावरील दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाहनांना आग लागल्याने घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. आगीमुळे महामार्गावर काही काळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी आणि संबंधित यंत्रणांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.
दोन्ही घटनांमध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या दोन्ही दुर्घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वाहनांना आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.
