‘चांगले काम करा; आगामी काळात २०० बेडच्या कॅन्सर रुग्णालयाचे उद्घाटन करू’
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आश्वासन; १०० बेडच्या महिला व बाल रुग्णालयासह शवविच्छेदन गृहाचे लोकार्पण
धुळे | प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत १०० बेडच्या महिला व बाल रुग्णालयासह शवविच्छेदन गृहाचे लोकार्पण शुक्रवारी (दि. २१ ऑगस्ट) करण्यात आले. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला.
यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जनतेला दर्जेदार आणि प्रभावी आरोग्यसेवा देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले. “चांगले काम करा; आगामी काळात धुळ्यात २०० बेडच्या कॅन्सर रुग्णालयाचे उद्घाटन करू,” असे आश्वासन त्यांनी दिले.
१०० बेडचे रुग्णालय सेवेत दाखल
धुळे जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून १०० बेडचे महिला व बाल रुग्णालय उभारण्यात आले होते. आरोग्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या वेळेअभावी त्याचे औपचारिक लोकार्पण रखडले होते. मात्र, लोकार्पण प्रलंबित असतानाही रुग्णांच्या हितासाठी हे रुग्णालय सेवेत सुरू करण्यात आले होते. त्याचा अनेक रुग्णांनी लाभ घेतला आहे.
अखेर शुक्रवारी मंत्र्यांच्या हस्ते या अत्याधुनिक व सर्व सुविधायुक्त रुग्णालयाचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले. यामुळे महिला व बाल रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
दर्जेदार रुग्णसेवेवर भर
यावेळी उपस्थित मंत्री व लोकप्रतिनिधींनी धुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
या कार्यक्रमास आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, महापौर मायादेवी परदेशी, जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. रवींद्र सोनवणे, हिरे रुग्णालयाचे डॉ. अजित पाठक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे, डॉ. तुळशीराम गावित यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
