नाहाटा महाविद्यालयात अँटी रॅगिंग कायद्याबाबत मार्गदर्शन; ‘रॅगिंग सहन करणेही गुन्हा’
अॅड. प्रिया अडकमोल यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; रॅगिंगच्या मानसिक व सामाजिक दुष्परिणामांबाबत जनजागृती
भुसावळ | प्रतिनिधी : येथील नाहाटा महाविद्यालयात युवती कल्याण समिती, महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार समिती, SHe Box तसेच भुसावळ तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अँटी रॅगिंग व कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंगविरोधी जनजागृती निर्माण करण्यासोबतच कायदेशीर अधिकारांची माहिती देणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. बी. एच. बऱ्हाटे होते. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रो. डॉ. जी. आर. वाणी, प्रमुख वक्त्या ॲड. प्रिया अडकमोल, पत्रकार उज्वला बागुल (PLV), सौ. रूपाली नेवे, सौ. नेहा जावरे, युवती कल्याण समिती प्रमुख प्रो. डॉ. गौरी पाटील, महिला तक्रार निवारण व विशाखा समिती प्रमुख प्रा. डॉ. विद्या पाटील तसेच SHe Box-अंतर्गत तक्रार समिती प्रमुख प्रा. डॉ. स्वाती फालक उपस्थित होत्या.
रोपट्याला पाणी देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रो. डॉ. गौरी पाटील यांनी केले.
यावेळी पत्रकार उज्वला बागुल यांनी विधी सेवा समितीच्या कार्याची प्राथमिक माहिती देत जिल्हा व गावपातळीवर विविध कायदेविषयक शिबिरे आणि उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले.
‘रॅगिंग सहन करणे हेदेखील गुन्हा’
प्रमुख वक्त्या ॲड. प्रिया अडकमोल यांनी अँटी रॅगिंग कायद्याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. “रॅगिंग सहन करणे हेदेखील एक गुन्हा आहे. रॅगिंग ही सीनियर होण्याची परंपरा नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या तसेच पीडित आणि रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर होणारे सामाजिक व मानसिक परिणाम त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले. कोणत्याही प्रकारची रॅगिंगची घटना घडल्यास विद्यार्थ्यांनी गप्प न राहता संबंधित यंत्रणेकडे तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
‘अभ्यासावर लक्ष केंद्रित करा’
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून इतरांना त्रास होईल, अशी कोणतीही कृती किंवा वर्तणूक करू नये, असे आवाहन केले. महाविद्यालयीन वातावरण आनंदी, सुरक्षित आणि शिस्तबद्ध ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक विद्यार्थ्याची असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पूनम महाजन यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. ममता पाटील यांनी मानले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा. डॉ. स्मिता चौधरी, प्रा. डॉ. ममता पाटील, प्रा. डॉ. रश्मी शर्मा, डॉ. निलीमा पाटील, प्रा. डॉ. संगीता भिरुड, प्रा. डॉ. पूनम महाजन, प्रा. अर्चना भालेराव, प्रा. प्रणिता राणे, प्रा. स्वाती शेळके, प्रा. स्मिता बेंडाळे, सौ. प्राजक्ता बागुल आणि श्रीमती शरयू भोळे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी, संगणक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
