माणुसकी अजून जिवंत! नशिराबाद पोलिसांसह नागरिकांनी अनोळखी व्यक्तीला दिला उपचारांचा आधार
मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात; मानव सेवा तीर्थ येथे उपचारासाठी दाखल
नशिराबाद | प्रतिनिधी :
रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी अनोळखी व्यक्ती दिसली की अनेकजण दुर्लक्ष करून पुढे निघून जातात. मात्र, नशिराबाद येथे नागरिक आणि पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवत मानसिकदृष्ट्या अस्वस्थ अवस्थेत आढळलेल्या एका अनोळखी व्यक्तीला उपचाराचा आधार मिळवून दिला. पोलिसांनी त्याला वैद्यकीय तपासणीनंतर चोपडा येथील मानव सेवा तीर्थ येथे पुढील उपचारासाठी दाखल केले.
दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास झिपरू अण्णा महाराज प्रवेशद्वाराजवळ रुपेश माळी यांच्या चहाच्या टपरीवर एक अनोळखी व्यक्ती आली. त्याने माळी यांच्याकडे विमलची मागणी केली. मात्र, विमल उपलब्ध नसल्याचे सांगून, “तुला काही खायचे असेल तर सांग, ते मी देतो,” असे माळी यांनी सांगितले. मात्र, संबंधित व्यक्तीने त्यास नकार दिला.
विसंगत उत्तरे आल्याने नागरिकांना संशय
यावेळी पोलीस दक्षता संपादक चंदन पाटील, साईमत प्रतिनिधी, डॉ. दीपक लोखंडे, दीपक बोंडे आणि विशाल पवार उपस्थित होते. त्यांनी संबंधित व्यक्तीची आपुलकीने विचारपूस केली. तो कुठून आला, त्याला कुठे जायचे आहे, तसेच त्याचे कपडे कुठे आहेत, याबाबत विचारणा केली असता त्याने दिलेली उत्तरे विसंगत आणि समाधानकारक नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यानंतर डॉ. दीपक लोखंडे आणि चंदन पाटील यांनी तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने पोलीस पथक घटनास्थळी पाठवून संबंधित व्यक्तीला नशिराबाद पोलीस ठाण्यात आणले.
वैद्यकीय तपासणीनंतर मानव सेवा तीर्थ येथे दाखल
पोलिसांनी सखोल चौकशी केली असता संबंधित व्यक्तीची मानसिक स्थिती अस्वस्थ असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला जळगाव येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मानसिक आरोग्यविषयक उपचारांची आवश्यकता असल्याचे सांगितले.
यानंतर नशिराबाद पोलिसांनी त्या व्यक्तीला चोपडा येथील मानव सेवा तीर्थ येथे पुढील उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी योग्य उपचार करून त्याला लवकरात लवकर बरे करण्याचा विश्वास व्यक्त केला. त्याच्या कुटुंबीयांचा शोध लागल्यानंतर त्याला कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही सांगण्यात आले.
यापूर्वीही १७ ऑगस्टला अशीच घटना
दरम्यान, दि. १७ ऑगस्ट रोजी नशिराबाद परिसरात अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यावेळीही एका अनोळखी व्यक्तीला नशिराबाद पोलिसांनी मानव सेवा तीर्थ येथे उपचारासाठी दाखल केले होते. उपचारानंतर त्याने आपले नाव अमरजीत असून आपण बिहारमधील रहिवासी असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्याला त्यांच्या स्वाधीन केले.
अनोळखी व्यक्ती आढळल्यास मदतीचे आवाहन
मानसिकदृष्ट्या अस्वस्थ किंवा अनोळखी व्यक्ती परिसरात आढळल्यास तिच्याकडे दुर्लक्ष न करता जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“तुमचा एक मदतीचा हात एखाद्या व्यक्तीला पुन्हा त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचवू शकतो,” हा संदेश या घटनेतून अधोरेखित झाला आहे.
नशिराबाद पोलिसांसह जागरूक नागरिकांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळे ‘माणुसकी अजून जिवंत आहे’ याचा प्रत्यय आला असून, त्यांच्या या कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
