लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिरात अन्नसुरक्षा व पोषणाबाबत जनजागृती
विद्यार्थी व पालकांना सकस आहार, स्वच्छता आणि निरोगी जीवनशैलीचे मार्गदर्शन
भडगाव प्रतिनिधी : गणेश रावळ
भडगाव : कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर, भडगाव येथे ‘ईट राईट स्कूल’ उपक्रमांतर्गत विद्यार्थी व पालकांसाठी अन्नसुरक्षा आणि पोषण विषयक जनजागृती सत्र उत्साहात घेण्यात आले. सुरक्षित, पौष्टिक आणि संतुलित अन्नाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सुवर्णा पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे होते. यावेळी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकस आहाराचे महत्त्व पटवून दिले
मार्गदर्शन करताना डॉ. सुवर्णा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी संतुलित आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व स्पष्ट केले. आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, कडधान्ये, दूध व दुग्धजन्य पदार्थ, पौष्टिक धान्ये तसेच पुरेशा प्रमाणात पाण्याचा समावेश करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
जंक फूड, अतिप्रमाणात तेलकट पदार्थ आणि गोड पदार्थांचे सेवन टाळावे, असेही त्यांनी सांगितले. आरोग्यदायी आहाराच्या सवयी बालपणापासूनच अंगीकारल्यास भविष्यात अनेक आरोग्यविषयक समस्या टाळता येऊ शकतात, असे मार्गदर्शन करण्यात आले.
स्वच्छतेच्या सवयींबाबतही मार्गदर्शन
विद्यार्थ्यांनी दररोज वैयक्तिक स्वच्छता राखावी, जेवणापूर्वी तसेच शौचालयाचा वापर केल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत, स्वच्छ पाणी प्यावे, नियमित व्यायाम करावा आणि पुरेशी झोप घ्यावी, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. घरासह शाळा आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
‘सकस आहार म्हणजे निरोगी शरीर आणि चांगल्या सवयी म्हणजे निरोगी जीवनाची गुरुकिल्ली’ हा संदेश विद्यार्थ्यांनी आत्मसात केला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करण्याचा संकल्प केला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अन्नसुरक्षा, पोषण, आरोग्य आणि स्वच्छतेबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला. शाळेच्या या उपक्रमाचे पालक व परिसरातून कौतुक होत आहे.
कार्यक्रमाचे फलक लेखन अनंत हिरे, तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केले. मुख्याध्यापक कमलेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीता शेलार, सुनिता देवरे, अनिता सैंदाणे, अनंत हिरे, ज्ञानेश्वर गांगुर्डे, सुयोग पाटील, सचिन पाटील, हरिचंद्र पाटील, किरण पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी चंद्रकांत पाटील यांनी परिश्रम घेतले.
