नशिराबाद पोलिसांची धडक कारवाई! शेळगावात अवैध वाळू वाहतुकीवर छापा; ४ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त
२५ ब्रास वाळूसह ट्रॅक्टर ताब्यात; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
नशिराबाद प्रतिनिधी :
नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली. शेळगाव परिसरात केलेल्या या कारवाईत सुमारे २५ ब्रास अवैध वाळू आणि एक ट्रॅक्टर असा एकूण ४ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गस्ती दरम्यान ट्रॅक्टर आढळला
दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारास नशिराबाद पोलिसांचे पथक शेळगाव परिसरात गस्त घालत असताना एक ट्रॅक्टर अवैधरीत्या वाळू वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून चालकाकडे वाळू वाहतुकीबाबत आवश्यक कागदपत्रांची चौकशी केली. मात्र, त्याच्याकडे कोणताही वैध परवाना किंवा आवश्यक कागदपत्रे नसल्याचे समोर आले.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, शेळगाव येथील तापी नदीपात्रालगतच्या गायरान जागेत त्याने साथीदारांसह वाळूचा अवैध साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली.

२५ ब्रास वाळूचा अवैध साठा उघड
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी २५ ब्रास वाळू आणि ट्रॅक्टर असा ४,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी अवैध वाळू वाहतूक व नदीपात्रालगत वाळूचा साठा केल्याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सफौ/१६३ संजय महाजन करीत आहेत.

अवैध वाळू तस्करांवर कारवाई सुरूच राहणार
नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू उत्खनन, वाहतूक व साठा करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अशा प्रकारची माहिती नागरिकांना आढळल्यास ती तातडीने पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या पथकाने केली. कारवाईत पोहेकॉ गुणवंत देशमुख, गिरीश शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल भरत बाविस्कर, पंकज सोनवणे व चासफौ रियाजोद्दीन काझी यांनी सहभाग घेतला.
