लोहारा येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न
ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य; सहा महत्त्वपूर्ण विषयांवर विधी सहाय्यक किशोर डोंगरे यांचे मार्गदर्शन
तालुका विधी सेवा समिती व श्री तपेश्वर ज्येष्ठ नागरिक मंडळाचा संयुक्त उपक्रम
पाचोरा | प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना कायदेविषयक माहिती मिळावी, त्यांच्या मूलभूत व संविधानिक हक्कांबाबत जनजागृती व्हावी तसेच गरजू नागरिकांना उपलब्ध असलेल्या विधी सेवा व विविध शासकीय योजनांची माहिती मिळावी, या उद्देशाने लोहारा येथे कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. तालुका विधी सेवा समिती, पाचोरा आणि श्री तपेश्वर ज्येष्ठ नागरिक मंडळ, लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे शिबिर उत्साहात पार पडले.
शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता ज्येष्ठ नागरिक अभ्यासिका हॉल, ग्रामपंचायत कार्यालयासमोर, लोहारा येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात पाचोरा न्यायालयातील विधी सहाय्यक किशोर डोंगरे यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांना विविध कायदेविषयक बाबींवर मार्गदर्शन केले.
सहा महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन
शिबिरात राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये, वैकल्पिक वाद निवारण पद्धती (ADR) व त्याचे फायदे, मानसिक आजार व बौद्धिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींसाठी NALSA Legal Services Scheme, 2024, मानव-वन्यजीव संघर्षातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी NALSA Scheme, 2025 तसेच गरिबी निर्मूलनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी NALSA Scheme, 2015 या सहा महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली.
विधी सहाय्यक किशोर डोंगरे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर अधिकार, नागरिकांची घटनात्मक कर्तव्ये आणि न्यायालयीन प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. तसेच वाद न्यायालयात न नेता सामोपचाराने सोडविण्यासाठी वैकल्पिक वाद निवारण पद्धती (ADR) किती उपयुक्त ठरू शकते, याची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
ज्येष्ठ नागरिकांनी हक्कांबाबत जागरूक राहावे
ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या कायदेशीर हक्कांबाबत जागरूक राहणे गरजेचे असून, कोणत्याही कायदेशीर अडचणीच्या प्रसंगी उपलब्ध विधी सेवा यंत्रणेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत कायदेविषयक माहिती पोहोचविण्यासाठी अशा जनजागृती शिबिरांची सातत्याने आवश्यकता असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
कार्यक्रमास तपेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भास्कर अंबीकर, सचिव बाबुलाल बोऱसे, बाबुलाल सुतार, प्रभाकर चौधरी, ईश्वर परदेशी, अ. अ. पटेल, अमृत चौधरी, श्रावण चौधरी, अॅड. एस. एस. गीते, रमेश पालीवाल, ज्ञानेश्वर राजपूत, कडुबा चौधरी, आशा काळे, चंद्रकला भडके, चंद्रभागा चौधरी, श्रीराम कलाल आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सामाजिक कार्यकर्ते अभिमान बाविस्कर यांनी परिश्रम घेतले.
तालुका विधी सेवा समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागात कायदेविषयक जनजागृतीचा उपक्रम राबवून नागरिकांना त्यांच्या हक्कांसह उपलब्ध विधी सहाय्याची माहिती देण्यात आल्याने उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ‘न्याय सर्वांसाठी’ या संकल्पनेनुसार कायदेविषयक माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
