पावसाळी पर्यटनाला बेफिकीरीचे ग्रहण! स्टंटबाजी, ट्रिपल सीट, धिंगाणा; पोलिसांच्या कारवाईची मागणी
खवल्या डोंगरावरील हृदयद्रावक घटनेनंतर पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : जॉन भालेराव
छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू होताच धरणे, घाट, धबधबे आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळांकडे पर्यटकांची पावले वळली आहेत. मात्र, निसर्गाचा आनंद घेताना काही हौशी पर्यटकांकडून होणारी बेफिकीर स्टंटबाजी, धोकादायक ठिकाणी सेल्फी-रील्स, ट्रिपल सीट प्रवास आणि भरधाव वाहनचालना यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. खवल्या डोंगरावरील हृदयद्रावक घटनेच्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी पर्यटनस्थळांवर विशेष बंदोबस्त ठेवून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
धोकादायक ठिकाणी रील्ससाठी जीव धोक्यात
पडेगाव-मिटमिटा रोड, दौलताबाद घाट, म्हैसमाळ रोड, जटवाडा, रसूलपुरा आदी परिसरांत पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. यातील काही तरुण डोंगराच्या टोकावर जाऊन धोकादायक पद्धतीने फोटो व रील्स बनवताना दिसून येतात. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहने उभी करून मोठ्या आवाजात गाणी वाजवणे, धिंगाणा घालणे, ट्रिपल सीट प्रवास करणे, भरधाव वेगाने वाहने चालवणे तसेच मोठ्या आवाजात हॉर्न वाजवणे असे प्रकारही वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
काही दुचाकीस्वारांकडून कर्णकर्कश सायलेंसरचा वापर करून स्टंटबाजी केली जात असल्याने इतर पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
खवल्या डोंगरावरील घटनेने सुरक्षेचा प्रश्न गंभीर
या बेफिकिरीच्या पार्श्वभूमीवर वाळूज एमआयडीसी परिसरातील खवल्या डोंगरावर घडलेली दुर्दैवी घटना पर्यटनस्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारी ठरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन मोबाईल घेण्याच्या मागणीवरून कुटुंबीयांशी झालेल्या वादानंतर १९ वर्षीय कुणाल चांदगुडे हा खवल्या डोंगरावर गेला होता. त्याने डोंगरावरून उडी मारण्याची धमकी दिल्यानंतर पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला समजावून सांगण्याचे प्रयत्न तब्बल तीन तास सुरू होते.
यानंतर दुपारी सुमारे १ वाजता त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे यांनी मुलाला पकडून मागे ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा तोल गेल्याने दोघेही दरीत कोसळल्याचे सांगण्यात येते. ही घटना पाहून आई संगीता यांनाही मोठा धक्का बसला आणि त्यांनीही डोंगरावरून उडी घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.
या घटनेत तिघांचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका क्षणाच्या निर्णयाने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
पर्यटनस्थळांवर विशेष बंदोबस्ताची मागणी
पावसाळ्यात पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनी धोकादायक डोंगरकडे, दऱ्यांच्या कडांवर किंवा घसरड्या ठिकाणी जाणे टाळावे. केवळ सोशल मीडियासाठी रील्स किंवा फोटो काढताना स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, पडेगाव-मिटमिटा रोड, दौलताबाद घाट, म्हैसमाळ, जटवाडा, रसूलपुरा तसेच इतर पर्यटनस्थळांवर छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी होत आहे.
स्टंटबाजी, ट्रिपल सीट, भरधाव वाहनचालना, वाहतूक नियमांचे उल्लंघन तसेच सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कठोर कारवाई झाल्यास धोकादायक प्रकारांना आळा बसून पावसाळी पर्यटन अधिक सुरक्षित करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
