अनुसूचित जातीतील सर्व घटकांना काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात आणणार : ॲड. अंकुश कटारे
चाळीसगावात काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीसाठी अनुसूचित जाती विभागाची बैठक; कार्यकर्त्यांना पक्षवाढीसाठी एकजुटीचे आवाहन
चाळीसगाव | प्रतिनिधी :
काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासोबतच अनुसूचित जातीतील सर्व घटकांना काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. अंकुश कटारे यांनी व्यक्त केला.
काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने ॲड. अंकुश कटारे यांच्या दौऱ्यादरम्यान चाळीसगाव येथील हिरापूर रोडवरील काँग्रेस कमिटीच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाच्या आगामी वाटचालीबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष ॲड. वाडीलाल भाऊ चव्हाण होते. शहराध्यक्ष नितीन भाऊ राजपूत यांच्यासह प्रदेश सरचिटणीस राहुल मोरे, प्रदेश सचिव अनिरुद्ध साळवे, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश अग्रवाल, जिल्हा सचिव नितीन परदेशी, नितीन सूर्यवंशी, विजय राजपूत, अमजद खान, गोकुळ सानप, ॲड. मयूर निकम, दशरथ वाघ, अनंत बागुल, राजू भोसले, सोमनाथ मोरे, सागर निकम, पंडित चव्हाण, सुभाष राठोड, निसार मुख्तार सय्यद, अंकुश राठोड, रघुनाथ पवार, अरुण राठोड, समाधान ठाकरे, भूषण पगारे, दीपक सर, सिद्धार्थ मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षाच्या ध्येयधोरणांची कार्यकर्त्यांना माहिती
यावेळी तालुकाध्यक्ष ॲड. वाडीलाल चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, संघटनात्मक भूमिका आणि आगामी काळातील पक्षवाढीसाठी आवश्यक असलेल्या उपक्रमांबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तळागाळातील नागरिकांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
अनुसूचित जातीतील सर्व घटकांना जोडण्याचा निर्धार
ॲड. अंकुश कटारे यांनी आपल्या मार्गदर्शनात अनुसूचित जातीतील विविध घटकांना काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात जोडण्यावर भर दिला. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्यांना संघटनेशी जोडणे आणि काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनसंपर्क अभियान राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आगामी काळात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी उपस्थित इतर मान्यवरांनीही काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी आपली मते मांडली. कार्यक्रमाच्या शेवटी शहराध्यक्ष नितीन भाऊ राजपूत यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
