सावदा पोलिसांची धडक कारवाई; गोवंशाची अवैध वाहतूक करणारे दोघे ताब्यात
छोटा हत्ती वाहनासह ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त; दोन गोवंशांची सुटका करून गोशाळेत रवाना
सावदा प्रतिनिधि अक्षय वाघ
सावदा शहरात गोवंशाची कत्तल करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर व निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या वाहनावर सावदा पोलिसांनी धडक कारवाई केली. शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री केलेल्या या कारवाईत पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, दोन गोवंशांची सुटका करण्यात आली. या कारवाईत वाहनासह एकूण ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त माहितीवरून पोलिसांचा सापळा
सावदा पोलीस ठाण्यातील पोलीस हेडकॉन्स्टेबल मोहसीन रहेमानखा पठाण व पोलीस हेडकॉन्स्टेबल निलेश बाविस्कर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, सावदा शहरातील ख्वाजा नगरसमोरील मरीमाता मंदिराजवळून गोवंशाची अवैध वाहतूक करणारे वाहन जाणार आहे. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी रात्री सुमारे ८.५० वाजता संबंधित ठिकाणी सापळा रचला.
यावेळी ख्वाजा नगरकडून येणारे पिवळ्या रंगाचे टाटा एस (छोटा हत्ती) वाहन क्रमांक MH 48 AG 5804 संशयास्पदरीत्या येताना आढळले. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता वाहनाच्या मागील बाजूस दोन गोवंश अत्यंत निर्दयपणे बांधलेल्या अवस्थेत आढळून आले.
दोन गोवंशांची सुटका
वाहनात एक सुमारे आठ वर्षांची तांबड्या रंगाची गाय आणि सुमारे पाच वर्षांचा पांढऱ्या रंगाचा गोन्हा आढळून आला. दोन्ही जनावरांना हालचालीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संबंधितांकडे जनावरांच्या खरेदी-विक्री अथवा वाहतुकीबाबत कोणतीही वैध कागदपत्रे किंवा परवाना आढळला नाही.
पोलिसांनी तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून जनावरांची तपासणी केली. त्यानंतर दोन्ही गोवंशांची सुटका करून त्यांना सुरक्षिततेसाठी गोशाळेत रवाना करण्यात आले.
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी अदनान शेख शगीर कुरेशी (वय १९, रा. इस्लामपुरा, खाटकीवाडा, सावदा) आणि निलेश रमेश पाटील (वय ४४, रा. प्लॉट भाग, टेलिफोन एक्स्चेंजजवळ, सावदा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या कारवाईत सुमारे १५ हजार रुपये किमतीची गाय, १५ हजार रुपये किमतीचा गोन्हा आणि सुमारे ३ लाख रुपये किमतीचे टाटा एस वाहन असा एकूण ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक ०२१९/२०२६ नुसार महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच मोटार वाहन नियमांतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस हेडकॉन्स्टेबल मोहसीन पठाण, निलेश बाविस्कर, पोलीस नाईक जाकीर मन्सूरी व सुनील सैंदाणे यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक जाकीर मन्सूरी करीत आहेत.
