माझ्या जडणघडणीत धुळे जिल्ह्याचे मोठे योगदान – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे
धुळे बार असोसिएशनतर्फे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांचा नागरी सत्कार; न्यायमूर्ती कर्णिकांकडून वकिलांच्या जागेचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन
धुळे | प्रतिनिधी :
“न्यायमूर्ती म्हणून आजपर्यंत मी केलेल्या कामाची पाळेमुळे धुळे जिल्ह्याशी जोडलेली आहेत. माझे वडील या जिल्ह्यात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. शहादा आणि शिरपूर येथे माझे बालपण गेले. या जिल्ह्याने मला खूप काही दिले असून, लोकसेवेचा संस्कारही याच भूमीत झाला,” असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी केले.
धुळे बार असोसिएशनच्या वतीने हिरे भवनच्या सभागृहात न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी विविध न्यायालयांतील विद्यमान व माजी न्यायमूर्ती, विधिज्ञ, सरकारी वकील तसेच धुळे बार असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना न्यायमूर्ती वराळे म्हणाले, “माझ्यावरील प्रेमाच्या वर्षावाने मी आणि माझी पत्नी अक्षरशः भिजून गेलो आहोत. धुळे जिल्ह्याशी माझे नाते केवळ व्यावसायिक नसून भावनिक आहे. माझे वडील येथे न्यायाधीश म्हणून कार्यरत असताना घडलेले अनेक प्रसंग आजही माझ्या स्मरणात आहेत.”

‘त्या’ आदिवासी महिलेच्या प्रसंगाने दिला सेवाभावाचा संस्कार
आपल्या वडिलांच्या न्यायाधीशपदाच्या काळातील एक आठवण सांगताना न्यायमूर्ती वराळे यांनी सांगितले की, एका आदिवासी महिलेला दारूबंदी कायद्याच्या साध्या प्रकरणात न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. तिचा जामीन मंजूर करण्याचे आदेश देत असल्याचे वडिलांनी तिला सांगितले. मात्र, त्या महिलेने जामीन घेण्यास नकार दिला.
“मी बाहेर आले तर मला काम करावे लागेल. माझे बाळ कसे आणि कुठे जन्माला येईल, हे मला माहीत नाही. मात्र, मी तुरुंगात राहिले तर सरकारी रुग्णालयात बाळाचा जन्म होईल आणि त्याला चांगला आहार मिळेल,” असे त्या महिलेने सांगितल्याची आठवण त्यांनी सांगितली.
हा प्रसंग वडील वारंवार सांगत असत. त्यातूनच समाजातील गरजू व्यक्तींच्या वेदना समजून घेण्याचा आणि त्यांच्या सेवेसाठी न्यायव्यवस्थेचा उपयोग करण्याचा संस्कार झाल्याचे न्यायमूर्ती वराळे यांनी स्पष्ट केले.
‘न्यायालयाकडे प्रत्येक व्यक्ती आशेने पाहते’
“लोकांना सेवा देण्याचे थेट माध्यम म्हणजे न्यायालय. न्यायालयात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याकडे आशेने पाहत असते. त्यात केवळ न्यायाधीशांचीच नव्हे, तर वकिलांचीही महत्त्वाची भूमिका असते,” असेही न्यायमूर्ती वराळे यांनी नमूद केले.
उच्च न्यायालयातील कार्यकाळात ज्येष्ठ न्यायाधीशांच्या मार्गदर्शनातून न्यायव्यवस्थेला व्यापक स्वरूप देण्याची दृष्टी विकसित झाली. जनहित याचिकांमुळे न्यायालयीन कार्याला व्यापक सामाजिक दृष्टिकोन मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायमूर्ती घुगे यांनी तीन मुलींच्या सर्पदंशाच्या प्रकरणात स्वतःहून (सुमोटो) याचिका दाखल केल्याचे उदाहरणही त्यांनी यावेळी दिले.
धुळे न्यायालयाची इमारत देशातील सर्वोत्तम ठरेल – न्यायमूर्ती कर्णिक
या कार्यक्रमात बोलताना न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी धुळे न्यायालयाच्या नवीन इमारतीबाबत माहिती देताना, “धुळे न्यायालयाची इमारत महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील सर्वोत्तम न्यायालयीन इमारतींपैकी एक ठरेल,” असा विश्वास व्यक्त केला.
वकिलांसाठी उपलब्ध जागेचा प्रश्नही सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. आवश्यकतेनुसार न्यायाधीशांच्या चेंबरची जागा कमी करून वकिलांना जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
कार्यक्रमापूर्वी न्यायमूर्ती कर्णिक यांनी धुळे न्यायालयाच्या नवीन इमारतीची पाहणी केली. यावेळी धुळे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राहुल भामरे यांनी वकिलांच्या जागेचा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर न्यायमूर्ती कर्णिक यांनी ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
मानपत्र देऊन गौरव
कार्यक्रमात धुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ विधिज्ञांच्या हस्ते न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच न्यायमूर्ती कर्णिक यांच्या जीवनपटाचे सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमापूर्वी न्यायमूर्तींनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या कक्षाला भेट दिली. तसेच धुळे बार रूममध्ये दिवंगत विधिज्ञांच्या प्रतिमांचे अनावरण करण्यात आले.
या वेळी न्यायमूर्ती सारंग कोतवाल, छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी, न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे, न्यायमूर्ती अजित कडेठाणकर, न्यायमूर्ती वैशाली पाटील-जाधव, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. समृद्धी भीष्म, महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य ॲड. ज्ञानेश्वर बागुल, माजी अध्यक्ष ॲड. अमोल सावंत, सदस्य नितीन चौधरी, केंद्र सरकारचे कौन्सिल समीर पंडित, जिल्हा सरकारी वकील देवेंद्र तवर, धुळे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राहुल भामरे, उपाध्यक्ष ॲड. विशाल साळवे, ॲड. सुनीता शिंदे, सचिव ॲड. बळीराम वाघ, ॲड. प्रसाद देशमुख, ॲड. भारती पाटील आदी उपस्थित होते.
न्यायमूर्ती वराळे यांचा परिचय ॲड. अमोल सावंत यांनी, तर न्यायमूर्ती कर्णिक यांचा परिचय ॲड. श्यामकांत पाटील यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. कुंदन पवार, ॲड. अश्वघोष हातेकर व ॲड. अमित वाघ यांनी केले. आभार प्रदर्शन ॲड. बी. डी. पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धुळे बार असोसिएशनची कार्यकारिणी, धुळे जिल्हा ग्राहक मंच वकील संघाची कार्यकारिणी, जिल्हा सरकारी वकील कार्यालय तसेच धुळे बारमधील वकिलांनी परिश्रम घेतले.
