चिंचोलीत किरकोळ वादातून वृद्ध महिलेला दगड-विटांनी मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा
बंद घराचा दरवाजा फावड्याने तोडल्याचा जाब विचारणे पडले महागात; ६५ वर्षीय महिला जखमी, यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
यावल | विशेष प्रतिनिधी – हर्षल पाटील :
चिंचोली (ता. यावल) येथे बंद घराचा दरवाजा फावड्याने का तोडला, असा जाब विचारल्याच्या कारणावरून एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेला दगड आणि विटांनी मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाणीत जखमी झालेल्या महिलेचे नाव लक्ष्मीबाई शेणपडू धनगर असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोली येथील मनोज रवींद्र पाटील आणि सुनीताबाई रवींद्र पाटील यांनी बंद घराचा दरवाजा फावड्याने तोडल्याचे लक्ष्मीबाई धनगर यांच्या निदर्शनास आले.
याबाबत त्यांनी “बंद घराचा दरवाजा फावड्याने का तोडला?” असा जाब विचारला. याचा राग मनात धरून संशयितांनी लक्ष्मीबाई यांना शिवीगाळ करत दगड आणि विटांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
डोक्याला व शरीराला दुखापत
या हल्ल्यात लक्ष्मीबाई धनगर यांच्या डोक्याला तसेच शरीराच्या इतर भागांना दुखापत झाली. घटनेनंतर त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा
या प्रकरणी पीडित महिलेचे नातेवाईक धनराज शेणपडू धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात मनोज रवींद्र पाटील आणि सुनीताबाई रवींद्र पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची नोंद घेत पोलिसांनी तपास सुरू केला असून, पुढील तपास पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहेत. घटनेमागील नेमके कारण आणि हल्ल्याची परिस्थिती याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
