अनुसूचित जातीतील सर्व घटकांना काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात आणणार : ॲड. अंकुश कटारे
चाळीसगावात काँग्रेस अनुसूचित जाती विभागाची बैठक; पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्धार
चाळीसगाव | प्रतिनिधी :
अनुसूचित जातीतील सर्व घटकांना काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी व्यापक जनसंपर्क अभियान राबविण्यात येईल, असा निर्धार काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. अंकुश कटारे यांनी व्यक्त केला.
काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या उद्देशाने ॲड. अंकुश कटारे यांच्या दौऱ्यादरम्यान हिरापूर रोड येथील काँग्रेस कमिटीच्या जनसंपर्क कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
बैठकीस तालुकाध्यक्ष ॲड. वाडीलाल भाऊ चव्हाण, शहराध्यक्ष नितीन भाऊ राजपूत यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अनुसूचित जातीतील सर्व घटकांना संघटित करण्यावर भर
यावेळी ॲड. अंकुश कटारे यांनी काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे आणि अनुसूचित जाती विभागाच्या आगामी कार्याची माहिती दिली. अनुसूचित जातीतील विविध समाजघटकांशी संवाद वाढवून त्यांना काँग्रेसच्या विचारधारेसोबत जोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच आगामी काळात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क वाढविणे आणि अनुसूचित जाती विभागाची प्रभावी बांधणी करणे, यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
तालुकाध्यक्ष ॲड. वाडीलाल चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे आणि आगामी काळातील संघटनात्मक कार्यक्रमाबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षाच्या विचारधारेचा प्रसार तळागाळापर्यंत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस राहुल मोरे, प्रदेश सचिव अनिरुद्ध साळवे, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश अग्रवाल, जिल्हा सचिव नितीन परदेशी, तसेच नितीन सूर्यवंशी, विजय राजपूत, अमजद खान, गोकुळ सानप, ॲड. मयूर निकम, दशरथ वाघ, अनंत बागुल, राजू भोसले, सोमनाथ मोरे, सागर निकम, पंडित चव्हाण, सुभाष राठोड, निसार मुख्तार सय्यद, अंकुश राठोड, रघुनाथ पवार, अरुण राठोड, समाधान ठाकरे, भूषण पगारे, दीपक सर, सिद्धार्थ मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत उपस्थित मान्यवरांनी पक्ष संघटन वाढीसाठी आपली मते मांडली. आगामी काळात पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीला अधिक गती देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
शहराध्यक्ष नितीन भाऊ राजपूत यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
