पाचोऱ्यात काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची आढावा बैठक
जिल्हाध्यक्ष ॲड. अंकुश कटारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; अनुसूचित जातीतील सर्व घटकांना काँग्रेसच्या प्रवाहात आणण्याचा निर्धार
पाचोरा | प्रतिनिधी :
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे नूतन जिल्हाध्यक्ष ॲड. अंकुश कटारे यांच्या अध्यक्षतेखाली पाचोरा येथे प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक उत्साहात पार पडली. काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष बापू सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी पाचोरा येथील शासकीय निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी माजी नगराध्यक्ष बापू सोनार यांच्या हस्ते नूतन जिल्हाध्यक्ष ॲड. अंकुश कटारे यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा दौऱ्यात मिळालेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी कटारे यांचे कौतुक केले. तसेच अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी पाचोऱ्याला दिल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव यांचे आभार मानले.

जिल्ह्यात सर्वसमावेशक संघटन उभारणार
यावेळी बोलताना नूतन जिल्हाध्यक्ष ॲड. अंकुश कटारे यांनी जळगाव जिल्ह्यात अनुसूचित जातीतील सर्व घटकांना एकत्रित करून काँग्रेससोबत सर्वसमावेशक आणि मजबूत संघटन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.
तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवून अनुसूचित जातीतील विविध समाजघटकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच त्यांना काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी आगामी काळात व्यापक जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीत काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीसह आगामी काळातील पक्षाच्या वाटचालीबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती
बैठकीस पाचोरा शहराध्यक्ष शकील शेख, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नंदू भाऊ सोनार, अनिरुद्ध साळवे, जुलाल भाऊ गायकवाड, आनंद बागुल, राजू भोसले, ॲड. प्रदीप सूर्यवंशी, ॲड. सुनील सोनवणे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार ॲड. सुनील सोनवणे यांनी मानले.
