धुळ्यात लाडक्या कानूमातेला भक्तीभावाने निरोप
दोन दिवसांच्या उत्सवानंतर वाजतगाजत विसर्जन; पांझरा नदीकाठी भाविकांची मोठी गर्दी, शेकडो वर्षांची परंपरा कायम
धुळे | प्रतिनिधी :
खानदेशाची कुलस्वामिनी म्हणून श्रद्धास्थान असलेल्या कानूमातेला धुळेकरांनी भक्तीभावाने आणि वाजतगाजत निरोप दिला. दोन दिवस चाललेल्या कानूमातेच्या उत्सवानंतर सोमवारी महाआरती करून मिरवणुकीद्वारे पांझरा नदीपात्रात कानूमातेचे विसर्जन करण्यात आले. यावेळी शहरातील विविध घाटांवर भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
“कानूमाते की जय… कन्हेर राजाची जय…” अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. कानूमातेला निरोप देताना भाविकांनी चांगला पाऊस पडू दे, बळीराजाला सुखाचे दिवस येऊ देत, शेतीला भरभरून उत्पन्न मिळू दे, अशी मनोभावे प्रार्थना केली.
कुटुंबीय एकत्र आले; पुरणपोळीचा नैवेद्य, जागरण अन् फुगड्यांचा उत्साह
शनिवारी शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणात कानूमातेची स्थापना करण्यात आली. या उत्सवानिमित्त परिवारातील सर्व सदस्य एकत्र येत कानूमातेला विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवतात. विशेषतः पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून रात्री जागरण, नृत्य आणि फुगड्यांचा आनंद घेत उत्सव साजरा करण्यात आला.
दोन दिवसांच्या या उत्सवामुळे घराघरांत आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करत कानूमातेचे मनोभावे स्मरण करण्यात आले.
डोक्यावर कानूमातेची मूर्ती घेत भक्तांचा जल्लोष
सोमवारी सकाळपासूनच कानूमातेच्या महाआरतीची तयारी सुरू होती. महाआरतीनंतर वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. असंख्य कुटुंबीय आणि भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. भाविकांनी डोक्यावर कानूमातेची मूर्ती घेत नृत्य करत आणि जयघोष करत भक्तिमय वातावरणात पांझरा नदीपात्राकडे प्रस्थान केले.
पांझरा नदीच्या विविध ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. पारंपरिक श्रद्धा आणि उत्साहाचा संगम झाल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
शंभर वर्षांहून अधिक काळाची श्रद्धेची परंपरा
धुळे शहरासह जिल्ह्यात कानूमातेच्या उत्सवाला शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा असल्याचे सांगितले जाते. पिढ्यान्पिढ्या जपली गेलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने आणि श्रद्धेने सुरू आहे. बदलत्या काळातही कानूमातेच्या उत्सवाच्या माध्यमातून कुटुंबीयांचे एकत्र येणे, पारंपरिक रूढी-परंपरांचे जतन आणि सामाजिक एकोपा कायम असल्याचे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळाले.
