पारोळ्यात महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य पुतळ्यासाठी २५ लाखांचा निधी मंजूर
शहरात जागा उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन; राजपूत समाजाच्या मागणीला आमदार अमोलदादा पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद
पारोळा | प्रतिनिधी :
शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेल्या वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजींचा भव्य पुतळा पारोळा शहरात उभारण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याचे आश्वासन आमदार अमोलदादा पाटील यांनी दिले. तसेच पुतळा उभारण्यासाठी शहरात योग्य जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
पारोळा येथील संपर्क कार्यालयात राष्ट्रीय राजपूत करणी सेना (राजपूत समाज, पारोळा) यांच्या पदाधिकारी, सदस्य व समाजबांधवांनी आमदार अमोलदादा पाटील यांची भेट घेतली. यावेळी पारोळा शहरात वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजींचा भव्य पुतळा उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासह आवश्यक निधी मंजूर करावा, अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली.
समाजाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद
यावेळी आमदार अमोलदादा पाटील यांनी समाजबांधवांशी सविस्तर संवाद साधत त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. पारोळा शहराच्या वैभवात आणि सांस्कृतिक ओळखीत भर घालणाऱ्या या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी योग्य जागा उपलब्ध करून देत २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
विविध महापुरुषांच्या स्मारकांची कामे मार्गी
पारोळा शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी तसेच महापुरुषांचा इतिहास आणि विचार जतन करण्याच्या दृष्टीने विविध स्मारकांची कामे सातत्याने मार्गी लावली जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज, संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज, क्रांतीज्योती महात्मा फुले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य पुतळ्यांच्या कामांना यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे.
याच धर्तीवर आता वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजींचा भव्य पुतळाही पारोळा शहरात साकारण्यात येणार आहे.
भावी पिढ्यांना मिळणार शौर्याची प्रेरणा
महाराणा प्रतापसिंहजींचे शौर्य, त्याग, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासोबतच त्यांच्या विचारांचा आणि इतिहासाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
महापुरुषांचे विचार आणि इतिहास जतन करणे ही सामूहिक जबाबदारी असून, पारोळा शहराचा विकास साधताना सामाजिक व सांस्कृतिक वारसाही जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.
