‘संदेश भूमी’ धुळे येथे ‘व्यसनाचे दुष्परिणाम’ विषयावर वर्षावास प्रवचन
तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून सशक्त राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे : प्रवचनकार सुहास रामराजे
धुळे | प्रतिनिधी :
भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा धुळे यांच्या वतीने आषाढ ते अश्विन पौर्णिमा वर्षावास प्रवचनमालेतील पुष्प क्रमांक ५ अंतर्गत ‘व्यसनाचे दुष्परिणाम’ या विषयावर प्रवचन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ‘संदेश भूमी’, मध्यवर्ती बसस्थानकाजवळ, धुळे येथे रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ बौद्धाचार्य तथा जिल्हा संघटक आयु. पोपटराव आण्णा मोहिते होते. प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुरेश आण्णा लोंढे, जिल्हाध्यक्ष महेंद्र (आण्णा) महाले आणि जिल्हा सरचिटणीस प्रा. राम जाधव उपस्थित होते. प्रवचनकार म्हणून बौद्धाचार्य तथा जिल्हा उपाध्यक्ष सुहास रामराजे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्पपूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी सामूहिक त्रिशरण व पंचशील ग्रहण केले.

व्यसनाधीन तरुण देशाचे उज्ज्वल भविष्य घडवू शकत नाही
‘व्यसनाचे दुष्परिणाम’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रवचनकार सुहास रामराजे म्हणाले, “तरुण हा देशाचा कणा आहे. त्यामुळे तो शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या सशक्त आणि सदृढ असणे आवश्यक आहे. व्यसनाधीन तरुण वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाबरोबरच देशाचे उज्ज्वल भविष्य घडविण्यात प्रभावी योगदान देऊ शकत नाही.”
भक्कम राष्ट्रनिर्मितीसाठी तरुण पिढीने सर्व प्रकारच्या वाईट व्यसनांपासून अलिप्त राहणे गरजेचे आहे. व्यसनमुक्त समाजनिर्मितीत प्रत्येकाने योगदान दिल्यास त्यामध्ये व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्राचे हित सामावलेले आहे, असेही रामराजे यांनी स्पष्ट केले.
शिवनाथ सोनवणे यांचा सत्कार
यावेळी शिवनाथ सोनवणे यांची धुळे महापालिकेत कायमस्वरूपी नियुक्ती झाल्याबद्दल भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा शाखा पदाधिकारी आयु. भटुभाऊ वाघ, भानुदास (दादा) भवरे, लक्ष्मण (दादा) खैरनार, उत्तरेश्वर गायकवाड, अनिल केदार, विनोद केदार, राजेश रामराजे, विशाल केदार, आनंदजी सोनवणे, भगवानदादा वाघ, नानाजी अहिरे, सुनीलभाऊ मोरे, शिवनाथ सोनवणे, तसेच यशोदाताई सपकाळे, सारंगाताई तायडे, अनिताताई रामराजे, विद्यताई सोनवणे, करिश्मा रामराजे, काजल केदार, कोमल सोनवणे, आर्यन रामराजे, वंश केदार यांच्यासह धुळे जिल्हा शाखेचे पदाधिकारी, धम्म उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जिल्हा कोषाध्यक्ष विजय कुमार देवरे सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सामूहिक सरणत्तयानंतर धम्म उपासिका काजलताई अनिल केदार अर्थात केदार परिवाराच्या वतीने उपस्थितांसाठी फलाहाराची व्यवस्था करण्यात आली.
