दस्तापूर जि.प. शाळेची दुरवस्था; शाळेसमोर घाणीचे साम्राज्य, किचन शेडची पडझड
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; दोन दिवसांत स्वच्छता न झाल्यास पंचायत समितीसमोर आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी | सोयगाव | शिवराम जाधव
दस्तापूर (ता. सोयगाव) : सोयगाव तालुक्यातील दस्तापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून, शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. किचन शेड तसेच स्वच्छतागृहाची पडझड झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, यामुळे शाळेतील लहान विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
शाळेच्या परिसरातील अस्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष गणेश बळीराम सोनवणे यांनी केला आहे. शाळेतील मुख्याध्यापकांना याबाबत वेळोवेळी तोंडी सूचना करूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नसल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २४ ऑगस्ट २०२६ रोजी गणेश सोनवणे यांनी पंचायत समिती, सोयगाव येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले. शाळेसमोरील घाण तातडीने साफ करून विद्यार्थ्यांना सुरक्षित व स्वच्छ वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शाळेच्या परिसरात साचलेल्या घाणीमुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असून, अस्वच्छतेमुळे विविध आजारांची लागण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पडझड झालेल्या किचन शेड आणि स्वच्छतागृहाचीही तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दोन दिवसांत स्वच्छता करा, अन्यथा आंदोलन
शाळेच्या परिसरातील घाण दोन दिवसांत साफ न केल्यास पंचायत समिती, सोयगावसमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष गणेश सोनवणे यांनी प्रशासनाला दिला आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन शाळेचा परिसर स्वच्छ करावा तसेच पडझड झालेल्या शेड व स्वच्छतागृहाची आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडूनही होत आहे.
छायाचित्र ओळ : गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष गणेश सोनवणे.
