सोनवद बुद्रूक येथे एचआयव्ही-एड्स जनजागृती कार्यशाळा उत्साहात
संक्रमणाचे मार्ग, प्रतिबंधात्मक उपाय, गैरसमज आणि भेदभावाबाबत ग्रामस्थांचे सवेदीकरण; शासकीय आरोग्य सुविधांचीही माहिती
धरणगाव | प्रतिनिधी प्रशांत शिंदे :
राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई आणि जिल्हा एड्स नियंत्रण कार्यक्रम, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘इंटेन्सिफाइड कॅम्पेनिंग’ उपक्रमांतर्गत सोनवद बुद्रूक येथे एचआयव्ही-एड्स जनजागृती व सवेदीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. २५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामपंचायत सोनवद बुद्रूक, ता. धरणगाव येथे झालेल्या या कार्यशाळेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘इंटेन्सिफाइड कॅम्पेनिंग’ उपक्रम १२ ऑगस्ट ते १२ ऑक्टोबर या कालावधीत शाळा, महाविद्यालये तसेच ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश एचआयव्ही-एड्सबाबत समाजात जनजागृती निर्माण करणे, गैरसमज दूर करणे आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा आहे.
एचआयव्हीबाबत गैरसमज दूर करण्यावर भर
कार्यशाळेत एचआयव्ही संसर्गाचे मार्ग, प्रतिबंधात्मक उपाय, एचआयव्ही-एड्सबाबतचे विविध समज-गैरसमज, कलंक व भेदभाव याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. एचआयव्ही संसर्ग कोणत्या मार्गाने होतो आणि कोणत्या मार्गाने होत नाही, याबाबत वैज्ञानिक माहिती देऊन नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यावर विशेष भर देण्यात आला.
एचआयव्ही बाधित व्यक्तींशी भेदभाव न करता त्यांना सामाजिक आधार देणे आवश्यक आहे. योग्य माहिती आणि संवेदनशील दृष्टिकोनातूनच एचआयव्हीशी संबंधित कलंक कमी करता येईल, असे यावेळी सांगण्यात आले. तसेच एचआयव्ही आणि एड्स प्रतिबंधक (प्रतिबंध व नियंत्रण) कायदा, २०१७ याबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली.
शासकीय आरोग्य सुविधांची माहिती
कार्यशाळेत विविध आजारांचे प्रतिबंध व निर्मूलन, उपलब्ध शासकीय आरोग्य सुविधा तसेच आरोग्यविषयक टोल फ्री क्रमांक याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास योग्य वेळी शासकीय आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
एचआयव्ही-एड्स प्रतिबंधासाठी जनजागृतीसोबतच लोकसहभाग आणि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी महत्त्वाची असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
ग्रामपंचायत पदाधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती
कार्यशाळेला ग्रामपंचायत सरपंच सौ. उज्वला धीरज पाटील, उपसरपंच नारायण देवरे, ग्रामपंचायत सदस्य सौ. आशाताई पाटील, गुलाब पाटील, सौ. वंदना पाटील, सौ. शितल पाटील, भाऊसाहेब सचिन पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आयसीटीसी विभाग, ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक ज्ञानेश्वर शिंपी, आरकेएसके समुपदेशक गणेश कुंभार, गटप्रवर्तक धनगर मॅडम, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, युवा मंडळी तसेच गावातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यशाळेत उपस्थित ग्रामस्थांनी एचआयव्ही-एड्स प्रतिबंध, उपचार आणि उपलब्ध शासकीय आरोग्य सुविधांबाबत माहिती जाणून घेतली. योग्य माहिती, जनजागृती आणि लोकसहभागाच्या माध्यमातून एचआयव्हीबाबतचे गैरसमज दूर करून समाजात सकारात्मक आरोग्यविषयक वातावरण निर्माण करण्याचा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.
